पंढरपूरमध्ये यमाई तलाव परिसरात गोशाळेचा विस्तार; पिकनिक स्पॉट विकसित करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

पंढरपूरमध्ये यमाई तलाव परिसरात गोशाळेचा विस्तार; पिकनिक स्पॉट विकसित करण्याचे निर्देश

भाविकांसाठी नवी सुविधा,गोशाळेसह पंढरपूरमध्ये आकर्षक पर्यटनस्थळ उभारणार

पंढरपूर येथील यमाई तलाव परिसरातील गोशाळेच्या विस्तारासह पिकनिक स्पॉट विकसित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भाविकांना नवीन सुविधा उपलब्ध होणार.

Pandhapur news :पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर शहरात धार्मिक व पर्यटन विकासाला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारीतील यमाई तलाव परिसरात कार्यरत असलेल्या गोशाळेच्या विस्तारासह त्या ठिकाणी आकर्षक पिकनिक स्पॉट विकसित करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी सोलापूर यांना याबाबत सूचना देण्यात आल्या.

सध्या या गोशाळेत सुमारे २२५ लहान- मोठ्या गौर जातीच्या गायींचे पालन केले जाते.या गायींच्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या नित्योपचार व महानैवेद्यासाठी केला जातो. गायींसाठी लागणारा चारा,पशुखाद्य व इतर आवश्यक सुविधा मंदिर समिती मार्फत पुरविल्या जातात. मात्र वाढत्या संख्येमुळे गोशाळेसाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने विस्ताराची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने पंढरपूर येथील गट क्रमांक १६१ मधील ३ हेक्टर १२ आर क्षेत्राची मागणी केली आहे. प्रस्तावित क्षेत्रातील सध्या वापरात असलेल्या १.२० हेक्टर मोकळ्या जागेचे आरक्षणातून वगळण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे गोशाळेच्या विस्तारासोबत त्या परिसरात भाविक व पर्यटकांसाठी आकर्षक, स्वच्छ व उपयुक्त पिकनिक स्पॉट विकसित करण्याचा विचार आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये धार्मिक पर्यटना बरोबरच कुटुंबियांसाठी विरंगुळ्याचे नवे केंद्र निर्माण होणार आहे.

या निर्णयामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता असून भाविकांना आणि गोशाळेतील गायींना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Back To Top