सहकार क्षेत्राचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय सहकार परिषद’ संपन्न
सहकार चळवळीमुळे ग्रामीण भारताची प्रगती सुनिश्चित होईल तसेच नव्या सामाजिक भांडवलाचे संकल्पनाही निर्माण होईल

नवी दिल्ली, PIB Mumbai ,25 SEP 2021- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्लीत ‘राष्ट्रोय सहकार परिषद’ संपन्न झाली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, आंतरराष्ट्रीय सहकार सहकार्याचे अध्यक्ष, डॉ एरियल गुआर्को, सचिव आणि सर्व सहकारी संस्था- ज्यात इफ्को, भारतीय राष्ट्रीय सहकार संघटना, अमूल, सहकार भारती, नाफेड आणि कृभको चे प्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.

देशभरातील सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; देशविदेशातील लोक आभासी माध्यमातून परिषदेत सहभागी
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी सहकार क्षेत्रातील 2,100 मान्यवरांना प्रत्यक्ष तर आभासी स्वरूपात सहभागी झालेल्या सहा कोटी लोकांना मार्गदर्शन केले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या धोरणाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
सहकाराचे तत्व आत्मसात करूनच देशातील सहकारी चळवळीची वाटचाल होणे आवश्यक
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना, ज्यावेळी सहकार चळवळीची आत्यंतिक गरज होती, अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. यासाठी, सहकार क्षेत्रातील कोट्यवधी लोकांच्यावतीने शाह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे, असे सांगत आजही त्याचे स्थान आणि महत्त्व तेवढेच प्रासंगिक आहे, असे शाह म्हणाले. मात्र अद्याप त्यात इतर अनेक नवनवे टप्पे गाठायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच या क्षेत्राचा नव्याने विचार करण्याची गरज असून, आपल्याला एक नवी रचना करत, कार्यसंस्कृतीचा अविभाज्य नैसर्गिक घटक म्हणून सहकार चळवळ त्यात समाविष्ट करावी लागेल, आणि याच पद्धतीने पुढे जावे लागेल, असेही ते म्हणाले.
सहकार चळवळ ग्रामीण समाजाचाही विकास करेल आणि एका नव्या सामाजिक भांडवलाची संकल्पना त्यातून विकसित करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकार क्षेत्रात, देशातल्या सर्व राज्यांसोबत मिळून केंद्र सरकार काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशात सहकारविषयक सामाजिक सेवा केंद्र स्थापन करण्यासह आवश्यक ती आकडेवारी गोळा करण्याच्या दिशेने, सहकार मंत्रालय काम करत आहे , असे शाह यांनी सांगितले. त्याशिवाय, देशात एक राष्ट्रीय सहकार उपक्रम निर्माण करण्याची गरज आहे असे सांगत कोणत्याही सहकारी संस्थेने या उपक्रमासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. आज देशात राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.
नागरी सहकारी बँकांच्या समस्या आणि त्यांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक याविषयी आपल्याला जाणीव आहे असे सांगत या क्षेत्राबाबत कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही अमित शाह यांनी दिली. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राला प्राधान्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारताचे सहकार क्षेत्र, भारतातील सहकारी चळवळ देशभरातील उत्तमोत्तम पद्धती एकमेकांना सांगण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ होऊ शकेल,असे आश्वासन, शाह यांनी आंतरराष्ट्रीय सहकार सहकार्याचे अध्यक्ष डॉ एरियल ग्वार्को यांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार सहकाराच्या बळावर देशात विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आम्ही सहकार ही संस्कृती बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.