चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा — गहिनीनाथ महाराज औसेकर

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन;

उष्णतेची दाहकतेमुळे दर्शनरांगेत स्पिंकलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत,मठ्ठा वाटप

पंढरपूर ता.05 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे 5.00 ते सकाळी 11.00 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, चैत्री यात्रेला होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन, दिनांक 15 ते 21 एप्रिल, 2024 या कालावधीत पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिनांक 09 एप्रिल, 2024 रोजी गुढीपाडवा सण साजरा होत असून, साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या, या सणाला भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारात घेऊन, या दिवशी पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना पुरेसा व अत्याधुनिक सोईसुविधा देण्याबाबत मंदिर समितीचे प्राधान्य राहणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दिवसेंदिवस उष्णतेची वाढणारी दहाकता लक्षात घेता, दर्शनरांगेत स्पिंकलर, कुलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत, मठ्ठा वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, पत्राशेड व दर्शनमंडप येथे आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रूग्णवाहिका ठेवण्यात येत आहेत.

दिनांक 05 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, दूरदृष्य प्रणालीद्वारे ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, दूरदृष्य प्रणालीद्वारे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे व वास्तुविशारद तेजस्विनी आफळे उपस्थित होत्या. सभेच्या सुरवातीला मंदिर जतन व संवर्धनातील कामाची पाहणी करण्यात आली व संवर्धनाची कामे वेळेत व दर्जेदार करावीत अशा सुचना पुरातत्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांना देण्यात आल्या चैत्री यात्रेत दिनांक 15 ते 21 एप्रिल, 2024 या कालावधीत पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गर्भगृहाचे काम सुरू असल्याने, पदस्पर्शदर्शन बंद आहे. त्यामुळे पदस्पर्शदर्शन सुरू होईपर्यंत भाविकांच्या हस्ते पुजा बंद करण्यात आलेल्या आहेत. नजीकच्या काळात होणारी चंदनउटी पुजा देखील मंदिर समिती मार्फत करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *