विराट कोहलीऐवजी ट्वेन्टी-२० विश्वचषकात या खेळाडूला कर्णधार करा, सुनील गावस्कर यांचा मोलाचा सल्ला


नवी दिल्ली : पुढील महिन्यात टी-२० विश्वचषक सुरू होत आहे. या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली टी-२० संघांचं कर्णधारपद सोडणार आहे. यानंतर भारतीय संघाची कमान कोण सांभाळणार याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. यात रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रोहित हा टी-२० संघाचा पुढील कर्णधार असावा, असं म्हटलं आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापासूनच रोहितने संघाची धुरा सांभाळावी. पुढील दोन विश्वचषकांसाठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असावा, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले, “मला वाटतं की, पुढील दोन विश्वचषकांसाठी रोहित कर्णधार असावा कारण तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. एक विश्वचषक पुढील महिन्यात आहे तर दुसरा एक वर्षानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे या क्षणी तुम्ही जास्त कर्णधार बदलू इच्छित नाही, पण रोहित शर्मा दोन्ही टी-२० विश्वचषकासाठी माझी निवड असेल.

हे होऊ शकतात उपकर्णधार
गावस्कर यांनी केवळ कर्णधारच नाही, तर पुढील दोन उपकर्णधार कोण असू शकतात, हे देखील सांगितलं. गावस्कर म्हणाले, “मला के.एल. राहुलला उपकर्णधार म्हणून पाहायचं आहे. मी रिषभ पंतलाही लक्षात ठेवेन, कारण त्याने ज्या प्रकारे स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे, ते विलक्षण आहे. ज्याप्रकारे तो गोलंदाजीत बदल करत आहे, ज्या प्रकारे तो एन्रिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडा या गोलंदाजांचा वापर करत आहे, ते कमाल आहे. तो एक हुशार कर्णधार असल्याचे यातून दिसून येते. आपल्याला नेहमीच एका चतुर कर्णधाराची आवश्यकता असते, जो त्वरित कार्यवाही करतो. राहुल आणि पंत हे दोन खेळाडू आहेत, जे उपकर्णधार होऊ शकतात.

यामुळे विराटने कर्णधारपद सोडले
कोहलीने काही दिवसांपूर्वीच विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आयपीएल २०२१ नंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपदही सोडणार आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय देताना कोहली म्हणाला होता की, कामाच्या ताणामुळे तो हा निर्णय घेत आहे. कोहलीने एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद कायम ठेवणार असल्याचे सांगितले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: