अवाजवी MRP विरोधात ग्राहक पंचायतीचे देशव्यापी आंदोलन; ग्राहकांना ईमेल मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

MRP लूट थांबवा! २५ मे रोजी जंतरमंतर येथे सत्याग्रह; ग्राहक पंचायतीचा केंद्र सरकारला इशारा

अवाजवी MRP दरामुळे ग्राहकांची होत असलेली लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांना लाखो ईमेल पाठविण्याची मोहीम सुरू असून २५ मे रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे सत्याग्रह आंदोलन होणार आहे

अवाजवी एमआरपीची लूट थांबवा – ग्राहक पंचायतीचे देशव्यापी आंदोलन

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या अवाजवी एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देशव्यापी आंदोलन सुरू केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. ग्राहकांना योग्य दरात वस्तू आणि सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने वस्तूंवर कमाल किरकोळ किंमत छापणे बंधनकारक केले. मात्र, अनेक उत्पादक आणि कंपन्यांकडून याच नियमाचा गैरफायदा घेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे.

ग्राहक पंचायतीच्या म्हणण्यानुसार दैनंदिन वापरातील पॅकिंग वस्तू,कपडे, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक साहित्य, रेडीमेड वस्तू, पादत्राणे तसेच औषधांवर २०० ते ३०० टक्क्यांपर्यंत अवाजवी एमआरपी छापण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना वास्तविक किंमतीपेक्षा अनेक पटीने अधिक पैसे मोजावे लागत असून ग्राहकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ग्राहक पंचायती कडून विविध स्तरावर या विषयावर पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून १ मे पासून देशभरातील ग्राहकांकडून पंतप्रधान, अर्थमंत्री, वाणिज्य मंत्री, उद्योग मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री यांना लाखो ईमेल पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारकडे सध्याचा एमआरपी कायदा रद्द करून उत्पादन खर्चावरील नफा २० ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा कायदा करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांचे निवेदन ११ मे रोजी राज्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

तसेच २० मे पर्यंत देशभरातील ग्राहकांकडून पंतप्रधानांना ईमेल पाठविण्याचे अभियान राबविले जाणार असून २५ मे रोजी नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

या देशव्यापी आंदोलनात अधिकाधिक ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांत सहसचिव दीपक इरकल, प्रांत सदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख, जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा कोषाध्यक्ष ललिता वांगडे, जिल्हा महिला प्रमुख माधुरी परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये आणि सहसचिव दीपक भंडारकवठेकर , तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचीव महेश भोसले, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top