पंढरपूर तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचा विक्रमी प्रतिसाद; 11 हजार 787 ग्रामस्थांना योजनांचा थेट लाभ
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान यशस्वी; पंढरपूरात हजारो नागरिकांची प्रलंबित कामे निकाली

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.16 मे : महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाला पंढरपूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत तब्बल 11 हजार 787 ग्रामस्थांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला असल्याची माहिती सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर येथील श्रीयश पॅलेस येथे नगरपालिका स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात महसूल विभागामार्फत 3 हजार 288 सेवा तर नगरपालिकेमार्फत 60 विविध सेवा व दाखल्यांचे वितरण करण्यात आले. अभियानांतर्गत फेरफार निकाली काढणे, सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा, 8-अ उतारे, विविध प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, सामाजिक योजना, कृषी सिंचन योजना, आरोग्य तपासणी आणि ई-मोजणी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
नगरपालिका प्रशासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू, प्रधानमंत्री आवास योजना परवाने, पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, जन्म-मृत्यू दाखले आणि वाळू नोंदणी सेवा देण्यात आल्या असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे,प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,तलाठी,मंडलाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

