श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शन पूर्णतः मोफत; पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा – मंदिर समिती

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शन पूर्णतः मोफत; पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा – मंदिर समिती

दर्शनासाठी पासच्या नावाखाली फसवणूक? वायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२६- पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची फी किंवा देणगी आकारली जात नसल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. मंदिर समितीमार्फत भाविकांना उपलब्ध करून दिले जाणारे मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन पूर्णतः निशुल्क स्वरूपात दिले जाते.

समाज माध्यमांवर सध्या एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर वायरल होत असून त्यामध्ये काही अज्ञात व्यक्तींकडून दर्शनासाठी पास उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तींनी मोबाईल क्रमांकाद्वारे डिजिटल पद्धतीने पैसे स्वीकारल्याची माहितीही समोर येत आहे.

मंदिर समितीने हा प्रकार भाविकांची आर्थिक फसवणूक करणारा आणि मंदिर संस्थेची बदनामी करणारा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंदिर समितीच्यावतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्णतः मोफत असून कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊ नयेत. दर्शनासाठी विशेष पास किंवा सुविधा देण्याच्या नावाखाली कोणीही पैसे मागत असल्यास तात्काळ मंदिर समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top