पंढरपुरात सुगंधित मावा विक्रेत्यांवर पोलिसांची मोठी कारवाई;१ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई भाजी मार्केटजवळ सुगंधित मावा विकणारे जाळ्यात,१.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Pandharpur Police: सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे ॲक्शन मोडमध्ये;प्रतिबंधित मावा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पंढरपूर उपविभागात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मिश्रित मावा विकणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.भाजी मार्केटजवळून १,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/ ०६/२०२६ : पंढरपूर शहर आणि परिसरात गुटखा व प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे भा.पो.से. यांच्या पथकाने ३० मे २०२६ रोजी रात्री पंढरपूर शहरातील भाजी मार्केटजवळ छापा टाकून १,१२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी रात्री ०७:४५ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे हे आपल्या पोलीस स्टाफसह पंढरपूर उपविभागात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान पंढरपूर शहरातील भाजी मार्केटजवळील कृष्णाचे हौदाजवळ आले असता दोन इसम वेगवेगळ्या स्कुटी मोटरसायकलवर पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये सुपारी मिक्स प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असलेला मावा विकताना आढळून आले.

एक आरोपी फरार, दुसरा पोलिसांच्या ताब्यात

पोलीसांना पाहताच त्या दोघांपैकी एक जण आपली स्कुटी मोटरसायकल तिथेच सोडून, माव्याची पिशवी घेऊन पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळावरून इमरान शौकत तांबोळी रा.रोहिदास चौक,पंढरपूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीची झडती घेतली असता त्यात सुगंधित तंबाखू मिश्रित मावा आढळून आला. पळून गेलेल्या दुसऱ्या इसमाबाबत चौकशी केली असता, त्याचे नाव सुरज राजपूत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत पोलिसांनी आरोपी इमरान तांबोळी याच्या ताब्यातील सुगंधित मावा व एक स्कुटी तसेच फरार आरोपी सुरज राजपूत याची स्कुटी मोटरसायकल असा एकूण १,१२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग, म.राज्य सोलापूरचे अन्नसुरक्षा अधिकारी चन्नवीर राजशेखर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv) सह वाचन कलम २७(३)(E), ३०(२)(A) व शिक्षा पात्र कलम ५९ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५ व १२३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोसई गोसावी,सपोफौ/कदम,पोकॉ/वैभव घायाळ,पोकॉ/टिंगरे, पोकॉ/१५२३ कदम आणि पोकॉ/११५० खटकाळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Back To Top