पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

जन्म-मृत्यू नोंद प्रकरणात लाचेची मागणी महागात; महसूल सहाय्यकासह खासगी इसमा विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ जून २०२६- जन्म-मृत्यू नोंदणी संदर्भातील प्रकरणात तहसीलदारांकडून लवकर आदेश मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंढरपूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात संबंधित महसूल सहाय्यकासह एका खासगी इसमाविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अलीफ शमशुद्दीन सुतार वय २९ वर्षे हे पंढरपूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. तर मारुती ज्ञानोबा वाघमारे वय ५० वर्षे हा खासगी इसम असून दोघांनी मिळून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तक्रारदार हे वकिली व्यवसाय करतात.त्यांनी आपल्या पक्षकारांच्या वतीने जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसील कार्यालयात दाखल केलेल्या प्रकरणात तहसीलदारांसमोर लवकर सुनावणी घेऊन आदेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी २ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे केली होती.

यानंतर एसीबीने २९ मे व १ जून २०२६ रोजी पडताळणी कारवाई केली.पडताळणीदरम्यान पंचासमक्ष लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर १ जून रोजी सापळा रचण्यात आला.या सापळा कारवाईत महसूल सहाय्यक अलीफ सुतार यांनी २ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) मधील कलम ७ व ७-अ अंतर्गत कारवाई करण्यात येत असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एसीबी सोलापूरचे प्रशांत चौगुले, रविंद्र लांभाते आणि शैलेश पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच पोलीस हवालदार संतोष नरोटे,स्वामीराव जाधव, गजानन किणगी, शिरीषकुमार सोनवणे,रामभाऊ घुगे, सलीम मुल्ला,राजू पवार आणि अक्षय श्रीराम यांच्या पथकाने सहभाग घेतला.​

एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी,कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Back To Top