भाळवणी ब्रँचसाठी उद्यापासून उन्हाळी दुसरे पाणी आवर्तन; शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
नीरा उजवा कालवा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक; चर्चेनंतर भाळवणी ब्रँचमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय
भाळवणी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ जून २०२६ :नीरा उजवा कालवा अंतर्गत भाळवणी ब्रँचच्या उन्हाळी दुसऱ्या पाणी आवर्तनाबाबत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मोरे व शाखा अभियंता श्री चक्के यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान भाळवणी ब्रँच परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजा, उन्हाळी हंगामातील पाण्याची आवश्यकता तसेच पिकांच्या संरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला.यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्या सकाळपासून भाळवणी ब्रँचमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.

या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उन्हाळी हंगामातील पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे.पाणी आवर्तन सुरू करण्याच्या निर्णयामुळे शेती उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, विलास देठे, प्रकाश देठे,नितीन शिंदे, सोनवणे साहेब,सावंत गुरुजी, जयंत शिंदे,दीपक गवळी,गोरख भुजबळ, महेश शिंदे, शफु शेख, दिलीप भानवसे,विठ्ठल चौगुले, भीमराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

