‘जलयुक्त शिवार’मुळं मराठवाड्यात पूर; पर्यावरणतज्ज्ञांचा स्पष्ट आरोप


हायलाइट्स:

  • मराठवाड्यातील पूरस्थितीला जलयुक्त शिवार योजना जबाबदार
  • पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचा आरोप
  • भाजपनं फेटाळले आरोप. जलयुक्त शिवार फायद्याची योजना

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तसंच, अनेक लोकांना स्थलांतर करावं लागलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची चर्चा सुरू असतानाच पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर (Atul Deulgaonkar) यांनी पूरसंकटाच्या मूळ कारणाकडं लक्ष वेधलं आहे. ‘मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीनं राबवली गेलेली जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजना कारणीभूत आहे,’ असा थेट आरोप देऊळगावकर यांनी केला आहे.

‘जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामं करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करू नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे. आपल्याकडं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीनं केली जाते. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही. त्याची ही परिणीती आहे,’ असं अतुल देऊळगावकर यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा: काकांनंतर पुतण्याचाही केंद्र सरकारवर निशाणा; रोहित पवार म्हणाले…

‘जलयुक्त शिवार योजना राबवताना काही ठिकाणी वाळू उपसली गेली. खरं तर हे नैसर्गिकरित्या पूर आटोक्यात आणणारे घटक आहेत. वाळू आहे. आजूबाजूची झाडी आहे. ती नष्ट झाल्यामुळं माती नदीच्या पात्रात जाऊन बसली. आता नदीच्या पात्रात किती माती आहे हे मोजलं पाहिजे. ती माती पाण्याला मुरू देत नाही. त्यामुळं प्रवाह वाढतो. मांजरा नदी तीन-तीन किलोमीटर कशी पसरते, पात्र ओलांडते, या सगळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे,’ अशी मागणी देऊळगावर यांनी केली.

वाचा: ‘शेतकऱ्यांना मदत करा हे सांगायला भाजप कशाला हवा?’

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनीही देऊळगावकर यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला आहे. ‘जलयुक्त शिवार’ हे मराठवाड्यात पूरस्थिती उद्भवण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. आम्ही आधीच त्यावर आक्षेप घेतला होता,’ असं पुरंदरे यांनी म्हटलं आहे.

भाजपला आरोप नामंजूर

देऊळगावकर यांचा आरोप भाजपनं स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे. ‘एखाद-दुसरं काम खराब झालं असेल तर संपूर्ण योजनेला दोष देणं चुकीचं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं म्हणणं योग्य नाही, उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्तमुळं मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे,’ असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तर, अतुल देऊळगावकर यांना मनोरुग्णालयात पाठवा,’ अशी टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

वाचा: किरीट सोमय्या आज राज्यपालांना भेटणार; राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: