आषाढी वारी 2026: शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल परिसरात दुकाने, स्टॉल्स व हातविक्रीस बंदी; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश
पंढरपूर आषाढी यात्रा: शेगाव दुमाला ते जुना दगडी पूल मार्गावर दुकाने उभारण्यास मनाई, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० जुलै २०२६:आषाढी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता आणि जुना दगडी पूल या परिसरात दुकाने उभारणे, हातविक्री करणे तसेच तात्पुरती हॉटेल्स व स्टॉल्स लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (2) अन्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले आहेत.

यंदा आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून, यात्रा कालावधी 15 ते 29 जुलै 2026 असा आहे. या काळात लाखो वारकरी आणि भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी तसेच चंद्रभागा नदीत स्नानासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात.
शेगाव दुमाला येथील भक्तीसागर (65 एकर) परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक वास्तव्यास असतात. त्यामुळे शेगाव दुमाला चौक, तीन रस्ता आणि जुना दगडी पूल परिसरात मोठी गर्दी निर्माण होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकाने,हातविक्रेते,तात्पुरती हॉटेल्स आणि स्टॉल्स उभारले जात असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि चेंगराचेंगरीसारख्या घटना घडण्याचा धोका वाढतो.
ही संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने संबंधित परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने, हातविक्री, हॉटेल्स किंवा स्टॉल्स उभारण्यास मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

