मंदिरे खुली झाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीत कसे असणार नियम? जाणून घ्या…
हायलाइट्स:
- धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यास सरकारची परवानगी
- योग्य नियोजन करण्याचं प्रशासनासमोर आव्हान
- नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार
तयारीचा आढावा आणि नियोजन करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डीत बैठक घेण्यात आली. राहाता व शिर्डीमधील महसूल, पोलीस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एस.टी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बाणायत म्हणाल्या, प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालं पाहिजे. प्रत्येकाने सहा फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या करोना नियमावलीतील मुख्य तीन नियमांचे पालन भाविक व नागरिकांकडून झालं पाहिजे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं. अशावेळी जे नियमावलीचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, राहाता तालुक्यात आतापर्यंत २४ हजार १६९ करोना रूग्ण आढळून आले आहेत. यातील १८ हजार ७०० रूग्ण केवळ दुसऱ्या लाटेतील आहेत. ३५९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४६२ जाणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ४०० मृत्यू दुसऱ्या लाटेतील आहेत. शिर्डी शहरात आतापर्यंत एक लाख २९ हजार लोकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे, तर ५६ हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. राहाता तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.०३ इतका आहे, तेव्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. शिर्डीमध्ये दक्षिण भारतातून जास्त भाविक येत असतात. अशा भाविकांची रेल्वे, विमानतळ व एस.टी बसस्थानकाच्या ठिकाणीच करोना चाचणी करावी. अहवाल निगेटिव्ह आल्यावर भाविकाला पुढे प्रवास करू द्यावा, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, या बैठकीला संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, शिर्डी विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक .सुनिल श्रीवास्तव, औद्योगिक सुरक्षा बलाचे उपसमादेशक दिनेश दहिवदकर उपस्थित होते.