गांधीवाद हे भारताने जगाला दिलेले नवे तत्त्वज्ञान होय – प्रा.डॉ.सुशील कुमार शिंदे

अहिंसेने युध्द जिंकता येते हे गांधीवादाचे यश

प्रा.डॉ.सुशील कुमार शिंदे
पंढरपूर - सत्य आणि अहिंसा ही मूल्ये महात्मा गांधीच्या लढ्याची शस्त्रे होती.प्रेम,दया,क्षमा, त्याग,आत्मबलिदान सत्याग्रह ही गांधीच्या तत्त्वज्ञानातील महत्त्वाची मूल्ये आहेत. क्रोधाला प्रेमाने, द्वेषाला प्रेमाने, मत्सराला दयेने आणि स्वार्थाला त्यागाने जिंकता येते हे महात्मा गांधीनी जगाला दाखवून दिले. मन परिवर्तन आणि मत परिवर्तन या बाबीने शत्रूला नामोहरम करता येते. अहिंसेने युध्द जिंकता येते हे गांधीवादाचे यश आहे. महापुरुषाच्या हत्या करून त्याचा देह नष्ट करता येतो, परंतु त्यांचा विचार नष्ट करता येत नाहीत. गांधीवाद हे भारताने जगाला दिलेले नवे तत्त्वज्ञान होय, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.सुशील कुमार शिंदे यांनी केले.

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या विद्यार्थी आघाडीच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एकविसाव्या शतकातील गांधीवादा ची प्रस्तुतता या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.जे.पी.बघेल हे होते. 

  पुढे बोलताना प्रा.डॉ.सुशील शिंदे म्हणाले की, रामायण, महाभारत आणि भगवदगीता या ग्रंथांचा महात्मा गांधी यांच्यावर विशेष प्रभाव होता. या शिवाय पाश्च्यात विचारवंत रस्किन आणि हेन्द्री थोरो यांच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. भगवदगीतेतील ‘अनासक्ती योग’ ही संकल्पना गांधीनी वेगळ्या पद्धतीने वापरली.येशू ख्रिस्ताच्या भूमिकेचा गांधीवर प्रभाव दिसतो. सेवावृती, धैर्य, निस्वार्थ आणि त्याग या बाबी महत्वाच्या आहेत. एकविसाव्या शतकातील विषमतेचे सर्व प्रश्न गांधीवादाच्या मार्गातून सुटू शकतात. गांधीनी समाजाच्या सर्वांगीण विकासाचे शास्त्र मांडले.
गांधीवादातून येणारी शांतता ही शाश्वत स्वरूपाची
डॉ.जे.पी. बघेल
अध्यक्षीय भाषणात डॉ.जे.पी.बघेल म्हणाले की,गांधी आणि भगवान गौतम बुध्द ही भारताची खरी ओळख असून गांधीजीनी मांडलेली ‘हिंद स्वराज्य’ ही संकल्पना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. गांधीवादातून येणारी शांतता ही शाश्वत स्वरूपाची आहे. प्रतिगामी शक्ती महात्मा गांधीचे नाव आणि फोटो घेवून पुरोगामीपणाचे सोंग आणत आहेत. हाच खरा गांधीवादासमोरील धोका आहे. महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पेरियार रामास्वामी नायकर व महात्मा गांधी यांचेच विचार देशाला तारणार आहेत.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी आघाडीचे मुंबई विभाग प्रमुख प्रा.प्रमोद बिडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष डॉ. दत्ता डांगे यांनी केले.या कार्यक्रमास डॉ.वसंत सरोदे,तुकाराम खांडेकर, डॉ.सविता दूधभाते, डॉ. महेश धायगुडे, मधुसूदन बरकडे, डॉ. सुरेश येवले, बिरू कोळेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आकाश सरीक यांनी मानले.  

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: