केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून, त्यांचा गैरवापर करुन सर्वांना नामोहरम करण्याचे काम सुरु – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

भाजप आणि एनसीबी हे कुणाला टार्गेट करायचे हे ठरवून काम करायला लागले आहेत – ना. जयंत पाटील

मुंबई – क्रुझ ड्रग्ज प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्या व्यक्ती हे स्वतःला एनसीबीला घेऊन जातात, आरोपीला ते स्वतः मनगटाला पकडून बाहेर काढतात, याचा अर्थ त्यांची भूमिका यात एनसीबीपेक्षा मोठी होती. भाजप आणि एनसीबी हे हातात हात घालून कुणाला टार्गेट करायचे हे ठरवून काम करायला लागले आहेत, असा आरोप जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा उपस्थित होते.

ही काही पहिलीच वेळ नाही, याच्या आधीही असे झाले आहे. भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या अमुकतमुक नेत्यावर कारवाई होईल असे सांगतात आणि कारवाई सुरु होते, अशा घटना आधीही घडल्या आहेच. आता तर भाजपचे पदाधिकारीच कारवाईमध्ये सामील झालेले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

या देशात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग आणि आता एनसीबीदेखील अशा पद्धतीने काम करू लागली आहे, हे देशातील जनतेला कळले आहे. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून, त्यांचा गैरवापर करुन सर्वांना नामोहरम करण्याचे काम सुरु असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

मुंबईत बॉलिवूड आहे. बॉलिवूडला आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान यामध्ये असू शकते. मुंबईतून बॉलिवूड दुसऱ्या राज्यात जावे, अशी इच्छा काहींच्या मनात असू शकते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या परिवारातील लोकांवर अशा पद्धतीने जाणीवपूर्वक व कृत्रिमरित्या कारवाई केलेली आहे का? अशी शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रग्ज प्रकरणात ज्या दोन खासगी लोकांचा सहभाग आहे, त्यांनी एनसीबीचे वाहन वापरले आहे. हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहीजे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: