विमानतळाच्या उद्घाटनावरून मानापमान; ‘लघु’ अक्षरांमुळं नारायण राणे नाराज


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज, शनिवारी उद्घाटन होत असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचे अद्यापही निमंत्रण देण्यात आलेले नाही. तर निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मीच वरिष्ठ असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

चिपी विमानतळाचे उद्घाटन शनिवारी होत असून या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार, कुणाचे स्थान कुठे असणार याविषयी आधीपासूनच चर्चेला तोंड फुटले होते. उद्घाटनाला २४ तासही राहिले नसताना या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वादावादी झाल्याचे पाहायला मिळते. राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘माणसाने संकुचित किती असावे? चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेत माझे नाव बारीक अक्षरात छापले आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय ते तिसऱ्या क्रमांकावर टाकले आहे’, अशी नाराजी राणे यांनी नोंदवली. सिंधुदुर्गाचा विकास आपणच केला असून चिपी विमानतळाचे कामही मीच मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. या कामाचे श्रेय माझे आणि भाजपचे आहे, असे म्हणत प्रत्यक्ष कायक्रमातही आम्हीच हे काम केल्याचे सांगणार आहोत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबत आमचा वाद नाही. वैर नाही. त्यांनी यावे त्यांचे स्वागत करताना सिंधुदुर्गाच्या माव्हऱ्याचा पाहुणचार करू. पण, जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या दोघांचीही नावे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे तर विमानतळाच्या बांधकामात योगदान असताना त्यांचेही नाव नाही. त्यामुळे हे हे सरकार राजकीय अभिनिवेषातूनच वागत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

नावे उघड करणार

‘कोकणात अडवणूक नाही तर हप्तेबाजी सुरू आहे. उद्या जाहीर सभेत हे कोण आहेत, त्यांची नावे सांगणार आहे. वास्तववादी चित्र कोकणी माणसासमोर ठेवताना विकासाच्या आड कोण येत आहे, त्यांचा भांडाफोड करणार आहे’, असे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: