राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत
हायलाइट्स:
- राहुल गांधी यांच्या मनात नेमकी काय आहे खंत?
- संजय राऊत यांनी उघड केला चर्चेचा तपशील
- राहुल यांची खंत खरी असल्याचं राऊतांचंही मत
संजय राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखात या भेटीचा तपशील सांगितला आहे. मंगळवारी दुपारी राऊत व राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये लखीमपूर प्रकरण व प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा झाली. ‘या लोकांनी देशात काय चालवलं आहे. हे लोक लोकशाही पूर्णपणे संपवत आहेत. मात्र, आम्ही लढणार. प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईला आम्ही घाबरत नाही. तुरुंगात जायला घाबरणार नाही. प्रियंकामध्ये हिंमत आहे. मी उद्याच लखनऊला जाणार आहे, मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असं राहुल गांधी म्हणाल्याचं संजय राऊत यांनी लेखात नमूद केलं आहे.
वाचा: याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक
देशातील विरोधी पक्षांच्या राजकारणाविषयी राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. ‘उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचं राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळं ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य जाती-धर्मात विभागलं आहे. त्यामुळंच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही,’ असं राहुल म्हणाले.
आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेविषयी देखील त्यांनी ‘मन की बात’ बोलून दाखवल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. ‘आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचं विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा: लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार