राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती, पुढील आठ दिवसात शासन निर्णय निघणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न मार्गी, लाखो भाविकांचे दर्शन होणार सुलभ

जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129.49 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून 23 सप्टेंबर रोजी मंजूरी

सोलापूर/ पंढरपूर,दि. 24(जिमाका):- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात.पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या चार वाऱ्या भरतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने 129.49 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समिती समोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केला. या आराखड्यास समितीने मंजुरी दिलेली असून पुढील आठ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी कार्तिकी, माघी,चैत्री एकादशी दिवशी पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला सुमारे 22 ते 25 लाख वारकरी भाविक येतात. कार्तिकी एकादशीला सुमारे 12 ते 15 लाख तसेच माघी व चैत्री एकादशीला साधारणतः सात ते आठ लाख वारकरी भाविक येतात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या एकादशीला एक लाख भाविक असतात. असे वर्षभरात एक कोटी पेक्षा जास्त वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. पंढरपूर येथे यात्रा कालावधीत भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पत्रा शेड येथे तात्पुरत्या स्वरूपाचा दर्शन मंडप उभारण्यात येतो व तेथूनच वारकरी दर्शनासाठी रांगेतून सोडले जातात परंतु सदरची व्यवस्था तात्पुरती असून, वारकरी भाविकांना दर्शन मंडप व रांगेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला दर्शनमंडप व स्काय वॉक आराखडा मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीकडे पाठवण्यात आला. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129.49 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून 23 सप्टेंबर रोजी मंजूरी दिली. आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 129.49 कोटी चा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन मंडप स्काय वॉकचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या हा आराखडा तयार केला. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा आराखडा प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजूर करून घेतला. त्यानंतर 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत हा आराखडा प्राथमिक दृष्ट्या मंजूर झालेला होता, त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी या समितीने या आराखड्यास मंजुरी दिली.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय पुढील आठ दिवसात निघेल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन मंडप व स्काय वॉक तयार झाल्यानंतर दिलासा मिळणार आहे.

सद्यस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना व भाविकांना दर्शन मंडप व रांगेत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भाविकांच्या तुलनेत सध्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. दर्शन मंडपा अभावी रांगेतील भाविकांना ऊन, वारा, पाऊस यामुळे सार्वजनिक आरोग्याचा त्रास होत आहे. तसेच वारी कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 24 ते 30 तास असा अवधी लागत असल्याने भाविकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते.दर्शन मंडपात व रांगेत भाविकांना बसण्याची सुविधा नाही. तसेच आपत्कालीन व्यवस्थेला अडथळा, वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अडथळा, शौचालय सुविधा या समस्या उद्भवत असतात .त्याचबरोबर गर्दी व अनियंत्रित पादचारी हालचाल फेरीवाले यामुळे भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागते. दर्शन रांगेतील घुसखोरी सुद्धा दर्शन कालावधीत वाढ करते. प्रतिवर्षी आषाढी वारीत महिला व जेष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात संख्या असते त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या लक्षात घेता भाविकांना सुलभ नियोजित व कमी वेळेत सुसाह्य दर्शन व्हावे तसेच दर्शन कालावधीत भाविकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 129 कोटी 49 लाखाच्या आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली आहे.

प्रस्तावित दर्शन मंडपमध्ये पिण्याच्या पाण्याचे सुविधा, शौचालय, लिफ्ट सुविधा, वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार आपत्कालीन मार्ग प्रसाद व सुरक्षा व्यवस्था हिरकणी कक्ष व दिव्यांग सुविधा अत्यावश्यक वाहन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.प्रशस्त दर्शन मंडप असल्याने भाविकांना सुरक्षित सुसह्य सुविधायुक्त दर्शनाची सोय होणार आहे. स्काय वॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा कोणताही त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनाचा कालावधी कमी करणे शक्य होईल. तसेच भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून विनामूल्य जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे.भाविकांना कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन टोकन यंत्रणा उभारण्यात येईल ज्यामुळे भाविकांना कमी वेळेत दर्शन करता येईल. याशिवाय प्रस्तावित प्रकल्पात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक तसेच स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

श्रींच्या दर्शनरांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम करणेकामी आराखडा तयार करून मंदिर समितीने सन 2018 मध्ये सभेत ठराव पारीत केला होता. या दर्शन हॉल व स्कायवॉकचे संपूर्ण व्यवस्थापन, टोकन दर्शन व्यवस्था, देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता व इतर अनुषंगिक सर्व सोयी सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे. सदर आराखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे.

श्रींच्या दर्शनरांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकाम करणेकामी आराखडा तयार करून मंदिर समितीने सन 2018 मध्ये सभेत ठराव पारीत केला होता. या दर्शन हॉल व स्कायवॉकचे संपूर्ण व्यवस्थापन, टोकन दर्शन व्यवस्था, देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता व इतर अनुषंगिक सर्व सोयी सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे. सदर आराखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे. या कामास शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर शासनाचे आभार मानले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading