भाजपा नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल; शिवसेनेचा खोचक टोला


हायलाइट्स:

  • महाराष्ट्रात ईडी, सीबीआयच्या धाडीवरुन राजकारण रंगले
  • सामनाच्या अग्रलेखातून भाष्य
  • शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबईः मुख्यमंत्रीपदावरुन सध्या राज्यात जोरदार राजकीय चर्चा रंगली होती. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता सामनाच्या अग्रलेखातूनही भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. कमी प्रतीचा गांजा या मखळ्याखाली अग्रलेख लिहून भाजप नेत्यांवर शिवसेनेनं जोरदार हल्ला केला आहे.

‘दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळ्या भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?’ अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?,’ असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

‘उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत व ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. दुसरे असे की, उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे बहुमत झाले व त्यांनी आपला नेता निवडला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

वाचाः चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख; शिवसेना म्हणते…

‘सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात. भाजपाचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा. ‘एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात’ असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजपा पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळय़ाचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजपा नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागण्याचा प्रकार; सिनेसृष्टीतील तिघांना अटक

अग्रलेखातील ठळक मुद्दे

  • उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली आहे व त्या घटनात्मक विधीस स्वतः फडणवीस उपस्थित होते. शपथविधीचा झगमगता सोहळा पाहून त्यांचेही डोळे दिपलेच असतील. डोळे दिपणे व डोळे फिरणे यात पुन्हा फरक आहे. महाराष्ट्रात भाजपाचे डोळे फिरले आहेत. त्यातून जो तिरळेपणा निर्माण झाला, त्यावर उपचारांची गरज आहे.

  • ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर, सूडबाजीवर घणाघात केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन चालवले आहे. राज्यांना काम करू द्यायचे नाही. विशेषतः ज्या राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री नाहीत, तेथे तर केंद्रीय तपास यंत्रणांचा मुक्त हैदोस घातला जात आहे. भाजपाकडून सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या आडून जे ‘शिखंडी’ पद्धतीचे राजकारण हे लोक करीत आहेत, त्याचा बुरखाच ठाकरे यांनी फाडला. ‘हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या’ असा आव्हानात्मक पवित्रा ठाकरे घेतात तेव्हा भाजपाने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी.

  • महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे. ‘विश्वास गमावला’ असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे. विरोधी पक्ष हा चेष्टेचा विषय बनला आहे व लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. केंद्रातील भाजपा धुरिणांना ‘विरोधी पक्ष’, ‘विरोधी सूर’ या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाहीत, पण महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे या मताचे आम्ही आहोत.

  • फक्त बेछूट आणि बेफाम आरोप करायचे व सरकार पाडण्याच्या तारखांचा घोळ करायचा हेच विरोधी पक्षनेत्यांचे काम नसते. सरकारचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे आयुष्य सरकारला मिळणारच आहे. सरकारच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात नाही. सरकार कधी गेले हे कळणारही नाही असे फडणवीस म्हणतात. हा त्यांचा निव्वळ अहंकार आहे. खरे तर फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच त्यांना अजून समजू शकलेले नाही. त्यामुळे फडणवीस किंवा पाटील जे बोलतात ते किती गांभीर्याने घ्यायचे? हा प्रश्नच आहे.

  • सरकार पाडण्याच्या तारखा देणे बंद करा व कामाला लागा, असे पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशीच भगवानगडावरून सांगितले. पंकजा बोलल्या तेच भाजपाचे अंतस्थ मतप्रवाह असावेत, पण भाजपामध्ये लोकशाहीला स्थान उरले नसल्याने पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यांच्या मतास किंमत उरलेली नाही. भाजपामध्ये उपऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे राज्य सुरू झाले आहे.

  • भाजपाचे वर्तमान कठीण आहे, भविष्यकाळ तर त्याहून कठीण आहे. २०२४ नंतर देशाच्या राजकारणात बदल होतील तेव्हा ईडी, सीबीआय, एनसीबी त्यांचे ऐकणार नाहीत व त्यावेळी तोंडून फालतूची गांजाफेक केली तर भलत्याच प्रसंगाला सामोरे जावे लागेल. नशेच्या अमलाखाली केलेले वक्तव्य आणि कृत्य लोक गांभीर्याने घेत नाहीत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: