वारी कालावधीत वारकरी,भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23:- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर 2024 आहे.या यात्रा कालावधीत वारकरी,भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले,प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, वैद्यकीय अधिक्षक डॉ महेश सुडके, मुख्यधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, सीसीसी टीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी. शेगांव दुमाला ते जुना दगडीपुल येथे कोणत्याही स्टॉलला परवानगी देवू नये.जुना दगडी पुलाला बॅरेकेटींग करावे. बोटीत भाविकांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने संबंधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची चेक पोस्टवरच आरोग्य तपासणी करावी
मंदीर समितीने दर्शनरांगेत,दर्शनमंडपात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात,दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. फायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे
वाहतुक विभागाने शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुक करताना रिक्षा चालकांकडून जादा दराची आकारणी होणार नाही याची दक्षता घ्यावी.आरोग्य विभागाने मुबलक औषधांचा पुरवठा उपलब्ध ठेवावा.यात्रा कालावधीत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी.65 एकरात प्लॉटचे वाटप सुरु करावे. भाविकांच्या सुरक्षेसाठी गॅस व इलेक्ट्रीक तपासणीसाठी पथकांची नेमणूक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, पत्राशेड, दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.
त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, नदी पात्रातील स्वच्छता, तात्पुरते शौचालय व्यवस्था, 65 एकर येथे आवश्यक सर्व सुविधा भाविकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी सांगितले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.