सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी

सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२०/जिमाका:- बचतगटांद्वारे संघटीत महिलांनी महिला मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व सांगावे. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे. आणि ‘महिला मतदार, मतदान करणार’ या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

वंदे मातरम सभागृहात आज महिला बचत गटांचा मतदार जनजागृतीबाबत मेळावा पार पडला. स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, मनपा उपायुक्त पांढरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक अशोक शिरसे, स्वप्निल सरदार, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास तसेच तालुका समन्वयक, महिला बचत गट सदस्य, बचत गटाच्या प्रमुख यांची मेळाव्यास उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला बचत गटाच्या महिलांचा संपर्क गावातील अन्य महिलांशी असतो. त्यामुळे त्यांनी आपापल्या गावात आर्थिक सक्षमीकरणासोबतच लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी योगदान द्यावे. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, हे त्यांना सांगावे.

महिलांनी स्वतः मतदान करण्याबरोबरच इतरांनाही मतदान करण्याचा संदेश द्यावा. आपण नागरिक म्हणून ज्या सेवा सुविधा, हक्क अधिकार प्राप्त करतो त्यासोबतच मतदान करण्याचे कर्तव्यही आपण पुर्ण केले पाहिजे. योग्य उमेदवार निवडणूक यावा यासाठी मतदानाचे प्रमाण वाढणे महत्त्वाचे आहे. भावी पिढी संस्कारक्षम घडावी यासाठी महिला आपल्या मुलांवर संस्कार करतात. त्याचप्रमाणे भावी पिढीला समृद्ध, सुदृढ लोकशाही मिळावी यासाठी महिलांनी मतदान करायला हवे. ‘महिला मतदार मतदान करणार’, या घोषवाक्यानुसार स्वतःसह इतर महिलांनाही मतदानाचे महत्त्व सांगून मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आपला सहभाग असावा असा निर्धार महिलांनी येथे करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ग्रामीण भागातील महिलांच्या सहभागामुळे जिल्ह्यात महिलाच्या मतदानाचे प्रमाण वाढेल, जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का पाहिजे.

महिला बचत गटांच्या या मेळाव्यात कीर्तन, पथनाट्य व विविध उपक्रमातून मतदान जागृती चे कार्यक्रम सादर करण्यात आले.

प्रास्ताविक अशोक शिरसे यांनी केले. स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प समनव्यक सुचिता खोतकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *