मोठी बातमी : सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रासह ११ खेळाडूंना खेलरत्न, ऑलिम्पिक गाजवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान


नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक २०२१ स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू नीरज चोप्रा याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (खेलरत्न पुरस्कार २०२१) निवड करण्यात आली आहे.
नीरज व्यतिरिक्त टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये चमकलेल्या इतर काही खेळाडू, महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह १० इतर खेळाडूंचीही देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी निवड झाली आहे. एकाच वेळी ११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नीरज चोप्रा व्यतिरिक्त मिताली राज, सुनील छेत्री, कुस्तीपटू रवी दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकी संघाचा गोलकीपर पी.आर. श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, भालाफेकपटू सुमित अंतिल, नेमबाज अवनी लेखरा, बॅडमिंटनपटू एम. कृष्णा नागर आणि नेमबाज एम. नारवाल यांचा समावेश आहे. याचबरोबर शिखर धवनसह ३५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमुळे यंदा क्रीडा पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे यंदा पुरस्कारांना उशीर झाला आहे. खेलरत्नसाठी एकाच वेळी इतक्या खेळाडूंची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी ५ खेळाडूंना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या वेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या नीरजसह इतर ४ पदकविजेत्या खेळाडूंचा खेलरत्नसाठी निवड करण्यात आली आहे, तर टोकियो पॅरालिम्पिकमधील अनेक विजेत्यांपैकी ५ खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी तयार करण्यात आलेल्या समितीने ११ खेलरत्नांव्यतिरिक्त ३५ अर्जुन पुरस्कारांचीही घोषणा केली.

नीरज चोप्राने ७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरले. ट्रॅक अँड फील्डमध्ये भारतासाठी पुरुष गटात भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर फेक करून भारतासाठी ऑलिम्पिक इतिहासातील ऍथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. इतकेच नाही तर ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तेव्हापासून खेलरत्नसाठी त्याचे नाव जवळपास निश्चित झाले होते. नीरजच्या नावावर आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदके आहेत.

त्याचबरोबर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याचीही उत्कृष्ट कामगिरीसाठी या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. रवीने ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. २०१२ मध्ये सुशील कुमार नंतर ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: