सांगलीतील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल
पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश
सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज ,२७ एप्रिल २०२५ : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, समाजकल्याण आयुक्त आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

२६ एप्रिल २०२५ रोजी उघडकीस आलेल्या या प्रकरणात, शाळेच्या मुख्याध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.
या घटनेसंदर्भात उपसभापती, विधानपरिषद कार्यालयाने श्रीमती रितु खोकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, सांगली, एपीआई, उमदी पोलीस स्टेशन तथा तपास अधिकारी श्री संदीप कांबळे, श्रीमती धनश्री भांबूरे, सह संचालक, समाजकल्याण, श्रीमती प्रियंका माने, माहिला व बालविकास अधिकारी व ईतर वरिष्ठ अधीकार्यांशी संपर्क साधुन घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अवगत करुन दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात मुख्याध्यापकाविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करून जलद न्यायप्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. घटनेत मदत करणाऱ्या अथवा सहभागी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यास सांगितले आहे. याशिवाय, घटना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित विद्यार्थिनींना समुपदेशन, कायदेशीर मदत व पुनर्वसनासाठी विशेष सल्लागार समिती स्थापन करण्याची आणि सर्व आश्रमशाळांमध्ये सुरक्षिततेसाठी उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नियमित चौकशी व निरीक्षण मोहिमा राबवाव्यात, असेही त्यांनी सुचवले.

