महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) कडून मंगेश चिवटे यांची फार्मा,हेल्थ केअर अँड वेलनेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) कडून मंगेश चिवटे यांची फार्मा, हेल्थ केअर अँड वेलनेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. उद्योग व आरोग्य क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्त्वाचे पाऊल.
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) या राज्यातील अग्रगण्य उद्योग प्रतिनिधी संस्थेकडून मंगेश चिवटे (मुंबई) यांची फार्मा,हेल्थ केअर अँड वेलनेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मॅकियाच्या अध्यक्ष रविंद्र मानगावे यांनी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार १० फेब्रुवारी २०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. २०२७ मध्ये मॅकिया स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करत असून या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

फार्मा,हेल्थ केअर अँड वेलनेस कमिटी ही औषधनिर्मिती, आरोग्य सेवा व वेलनेस क्षेत्रातील विकास,नवोन्मेष आणि सहकार्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.उद्योग क्षेत्रातील आव्हानांवर उपाय शोधणे,जनजागृती करणे आणि आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे ही या समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यातील अग्रगण्य व प्रतिष्ठित उद्योग प्रतिनिधी संस्थेच्या Pharma, Health Care & Wellness Committee च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
स्वीकारपत्राद्वारे त्यांनी MACCIA सारख्या मान्यवर व विश्वासार्ह संस्थेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. विशेष म्हणजे MACCIA च्या शताब्दी वर्षाच्या ऐतिहासिक टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळणे, हे स्वतःसाठी सन्मानास्पद व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंगेश चिवटे यांनी संस्थेच्या ध्येय-धोरणांनुसार समितीच्या कार्यात पूर्ण क्षमतेने योगदान देण्याची ग्वाही दिली आहे. औषधनिर्मिती,आरोग्यसेवा,वेलनेस क्षेत्र हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या क्षेत्रातील नवकल्पना,उद्योगांमधील समन्वय,आरोग्यविषयक जनजागृती आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न राहील, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
MACCIA चे पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्य,समिती सदस्य,उद्योग प्रतिनिधी, आरोग्य तज्ज्ञ आणि धोरणकर्ते यांच्या सहकार्याने समितीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आणि भरीव कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
मंगेश चिवटे हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मूळ संकल्पक व कक्ष प्रमुख म्हणूनही कार्यरत असून, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत MACCIA कडून त्यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर सोबतची ही नवी वाटचाल उद्योग आणि आरोग्य क्षेत्रासाठी नवे आदर्श निर्माण करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

