विधानभवन मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद
अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका… या विषयावर विचारमंथन
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून, 2025 रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उप सभापती श्री.हरिवंश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार असून यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन,महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ.संजय जयस्वाल,महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर दि.24 जून 2025 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची वार्ताहर परिषद होईल.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये Role of Estimates Committee in Effective Monitoring and Review of Budget Estimates for Ensuring Efficiency and Economy in Administration अर्थात, प्रशासनीक कार्ये सक्षमपणे आणि अल्पव्ययासह होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होईल. या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसदेच्या तसेच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.
अंदाज समित्यांच्या शिफारसी प्रशासनातील गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सरकारी खर्चाचे प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टिने अत्यंत उपयुक्त ठरत असतात. जानेवारी, 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेली लोकसभा अध्यक्ष श्री.ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील 84 वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठीचे जुलै, 2024 मधील संबोधन, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त 03 सप्टेंबर, 2024 रोजीचा ग्रंथप्रकाशन सोहळा या ऐतिहासिक कार्यक्रमांच्या मालिकेत आता ही परिषद देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.


