जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन
पुणे,दि.30 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन मार्फत २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. यंदा २०२५ सालच्या दिनाचे घोषवाक्य Tourism and Sustainable Transformation असे असून शाश्वत पर्यटन विकासास चालना देणे हा प्रमुख उद्देश आहे.

या निमित्ताने दिशा हॉलिडेज व पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथील १०० विद्यार्थ्यांसाठी सिंहगड हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले.
सिंहगड किल्ल्याची निवड ही केवळ सहलीसाठी नसून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कार व प्रेरणांचा जिवंत धडा मिळावा या हेतूने करण्यात आली होती. स्वराज्याच्या इतिहासातील सिंहगडाचे महत्त्व अधोरेखित करताना नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उच्चारलेले गड आला,पण सिंह गेला हे अमर वचन विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले.
या वॉकदरम्यान विद्यार्थ्यांनी इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्यातील सत्य, त्याग, कर्तव्य आणि सन्मान या मूल्यांचे महत्त्व जाणून घेतले. सदर सहल विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आली होती.