संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्याया विरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – मंगेश चिवटे यांचे आवाहन

शिक्षण हक्कासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभाग – मंगेश चिवटे यांची भूमिका जाहीर

संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्यायाविरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – चिवटे यांचे आवाहन

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/१२/२०२५: राज्यभर सुरु असलेल्या संचमान्यता धोरणातील बदल, शिक्षकांवरील वाढते जाचक नियम, अतिरिक्त घोषित होणारी हजारो पदे तसेच मातृभाषेतील शिक्षणावर निर्माण झालेला गंभीर धोका या सर्व प्रश्नांवर कठोर भूमिका घेत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभागाची घोषणा केली आहे.

चिवटे यांनी आज आपल्या जाहीर निवेदनातून सांगितले की,शिक्षण प्रणालीवर सरकारी निर्णयांमुळे निर्माण झालेल्या अन्यायाविरोधात संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नाही.ते म्हणाले की मातृभाषेतील शिक्षण धोक्यात आले आहे.नव्या संचमान्यता धोरणांमुळे लहान गावे, वाड्या-वस्त्यांतील मातृभाषेतील शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत.आधार प्रमाणीकरणा तील अडथळ्यांमुळे अनेक शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरत आहेत व शाळांचा दर्जा धोक्यात आला आहे.

शिक्षकांवर वाढते ओझे

ऑनलाईन अहवाल,कार्यक्रम व अतिरिक्त कामामुळे शिक्षकांना वर्गातील अध्यापना पासून दूर नेले जात असल्याची मंगेश चिवटे यांनी टीका केली आहे.शिक्षक – विद्यार्थी संवादाची साखळीच कमजोर केली जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

टीईटीची सक्ती – शिक्षकांना असुरक्षितता

चिवटे यांनी टीईटी सक्तीचा मुद्दाही उपस्थित केला.अनेक अनुभवी शिक्षकांच्या भविष्यावर टांगती तलवार निर्माण झाली असून राज्य सरकारने २०१७ चा कायदा केंद्राकडे बदलण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

५ डिसेंबरचे आंदोलन — शांत परंतु निर्णायक

सरकारमध्ये असूनही अन्यायाविरोधात बोलण्याचे बळ मला एकनाथ शिंदे यांनी दिले. म्हणूनच मी शाळा बंद आंदोलनात शिक्षकांसोबत ठाम उभा आहे,असे मंगेश चिवटे म्हणाले.

ते पुढे म्हणाले हा दिवस रागाचा नाही तर स्वाभिमानाचा असेल.हा दिवस अराजकतेचा नाही पण शिस्तबद्ध विरोधाचा असेल.हा दिवस पगारासाठी नव्हे, तर मुलांच्या भविष्यासाठी आणि मातृभाषेच्या अस्तित्वासाठी असेल.

जिल्हा-जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळांचे कामकाज बंद ठेवून शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत मंगेश चिवटे म्हणाले,उद्या इतिहास लिहिला जाईल तेव्हा मी म्हणू शकेन – हो,शिक्षण हक्काच्या लढ्यात मीही होतो.

Leave a Reply

Back To Top