कीपॅड मोबाईलसाठी जबरदस्ती इंटरनेट रिचार्ज का? – संसदेत राघव चढ्ढा यांचा थेट सवाल

कीपॅड मोबाईलसाठी जबरदस्ती इंटरनेट रिचार्ज का? – संसदेत राघव चढ्ढा Raghav Chadha यांचा थेट सवाल

न वापरलेला डेटा गायब का? संसदेत कीपॅड प्लॅनवर राघव चड्ढा आक्रमक

नवी दिल्ली : कीपॅड मोबाईल फक्त कॉल आणि SMS साठी वापरला जातो, मग ग्राहकांकडून इंटरनेटचे पैसे जबरदस्तीने का घेतले जातात? असा थेट प्रश्न खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत उपस्थित केला. हा मुद्दा देशातील कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या मनातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात आजही सुमारे ४० कोटींहून अधिक नागरिक कीपॅड फोन वापरत आहेत. ग्रामीण भाग, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक स्मार्टफोन ऐवजी साधा मोबाईल वापरणे पसंत करतात. मात्र दूरसंचार कंपन्यांच्या ‘कॉम्बो रिचार्ज’ योजनांमुळे इंटरनेट सेवा नको असतानाही ग्राहकांना महागडे पॅक घ्यावे लागत असल्याची टीका होत आहे.

डेटा कॅरी फॉरवर्ड’चाही मुद्दा चर्चेत

सध्या बहुतेक रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १.५ GB किंवा २ GB डेटा दिला जातो. मात्र ग्राहकांनी पूर्ण डेटा वापरला नाही, तर तो रात्री १२ वाजल्यानंतर आपोआप संपुष्टात येतो. न वापरलेला डेटा पुढील दिवशी ‘कॅरी फॉरवर्ड’ (Carry Forward) केला जात नाही, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.पैसे आपले आणि न वापरलेला डेटा पुन्हा कंपनीचाच, हा कोणता न्याय? असा सवाल सोशल मीडियावर नागरिकांकडून विचारला जात आहे.

खासदार राघव चड्ढा यांनी ५० ते १०० रुपयांत महिनाभर चालणारा केवळ कॉलिंग आणि एसएमएसपुरता मर्यादित स्वस्त प्लॅन उपलब्ध करावा, अशी मागणी संसदेत केली. वाढते रिचार्ज दर, डिजिटल दरी (Digital Divide) आणि सामान्य माणसावर होणारा आर्थिक ताण याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या प्रश्नानंतर दूरसंचार धोरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडण्याचा अधिकार आणि न वापरलेल्या डेटाबाबत स्पष्ट धोरण असावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Back To Top