मोबाईल लोकेशनच्या मदतीने बालविवाह उधळला; निर्भया पथकामुळे १७ वर्षीय मुलीला मिळाले नवे जीवन
निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवे जीवन
Pandhapur police पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २ जून : पंढरपूर ग्रामीण हद्दीत होणारा एक बालविवाह रोखण्यात पंढरपूर विभागाच्या निर्भया पथकाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारमय होण्यापासून वाचले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निर्भया पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पंढरपूर ग्रामीण परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह मंगळवारी सकाळी १० वाजता होणार होता. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. नवरदेवाच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत संबंधित ठिकाणाचा शोध घेण्यात आला आणि विवाहस्थळी पोहोचून पोलिसांनी कारवाई केली.
सदर ठिकाणी चौकशी केली असता मुलीच्या नातेवाईकांनी आधारकार्ड सादर केले. त्यामध्ये मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक खातरजमा करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखलाही तपासला. त्या दाखल्यावरूनही मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर निर्भया पथकाने विवाहस्थळी उपस्थित नातेवाईक, मंडपातील मंडळी आणि मुलीच्या वडिलांना बालविवाहाचे कायदेशीर व सामाजिक परिणाम समजावून सांगितले. योग्य समुपदेशनानंतर हा बालविवाह तात्काळ थांबविण्यात आला.
पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले.
निर्भया पथकाने पंढरपूर शहर, तालुका,ग्रामीण भाग तसेच करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात किंवा नातेवाईकांमध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधावा. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य व भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव-रावण यांच्यासह म.पोकॉ/१३११ निर्मला वाघमारे,म.पोकॉ/२०४८ शाहिन, पोकॉ/१२३६ शशिकांत सावंत, पोकॉ/१३९५ लक्ष्मण कुचेकर, चापोकॉ/७२ पांडुरंग टिंगरे,काझी यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

