अनाथांची दिवाळी गोड करण्यासाठी धावली मैत्री

अनाथांची दिवाळी गोड करण्यासाठी धावली मैत्री

रोपळे ता.पंढरपूर तालुक्यातील 1994 -95 च्या दहावीच्या बॅचचा उपक्रम मनापासुन मनापर्यंत पोहचण्याची सामाजिक संकल्पनेने मुलांच्या ओठावर फुलले आनंदाचे हासू

रोपळे ,प्रतिनिधी - दिवाळी म्हटलं कि सर्वांच्या घरामध्ये आनंद आणि फराळाची मेजवानी असते. परंतु ज्या मुलांच्या नशीबी घरच नाही तर दिवाळीचा आनंद कुठला ? अशा मुलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून पंढरपूर तालुक्यातील रोपळे विद्यालयाच्या 1994 - 95 मधील इयत्ता दहावीच्या बॅचमधील मित्रांनी मोहोळ येथील भारतमाता आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना फराळाचे वाटप केले.

    गेली अनेक दिवसांपासुन मैत्रीचे ऋणानुबंध जोपासत अनेक सामाजिक उपक्रम या बॅचमधील मित्रांनी राबविले असून यातून आपली सामाजिक कर्तव्याची जाणीव त्यांनी दाखवून दिली आहे. यंदाहि अनाथ मुलांची दिवाळी गोड करण्याचा मनापासून मनापर्यंत हा सामाजिक संकल्प करून मोहोळ येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना दिवाळी फराळाचे वाटप केले. यावेळी बॅचमधील दादा रोकडे, डॉ.पंडीत माळी, दत्ताभाऊ भोसले, येवतीचे माजी सरपंच गणेश पाटील, रोपळे येथील तानाजी पवार,बाळासाहेब भोसले, पोपट भोसले आदी उपस्थित होते. बाहेर गावी असणार्‍या बॅचमधील मित्रांचेही या उपक्रमासाठी  मोलाचे सहकार्य लाभले.

या फराळ वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपलीही दिवाळी कुणीतरी गोड करत आहे याचा आनंद त्या मुलांच्या चेहर्‍यावर हसू फुलवित होता. या मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद हेच खरे आपली दिवाळी साजरी करण्यातील समाधान असल्याच्या भावना यावेळी बॅचमधील मित्रांनी व्यक्त केल्या. यापुढील काळातहि आपले सामाजिक कर्तव्य जोपासत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याची ग्वाहिही त्यांनी यावेळी दिली.

सामाजिक कर्तव्य जोपासणार्‍या मित्रांचा अभिमान – आपल्या आनंदाच्या क्षणी दुसर्‍यांनाही आनंद मिळावा यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कर्तव्याची भुमिका पार पाडणार्‍या 1994-95 मधील या बॅचच्या मित्रांचा अभिमान वाटत आहे. मित्रांनी एकत्रित येवून राबविलेले उपक्रम अनेक गरजुंचा आधार बनत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याने त्याचा अभिमान वाटत आहे.
दादासाहेब लोखंडे, रोपळे ता.पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: