Kailash Vijayvargiya: ‘तृणमूल’मध्ये प्रवेशासाठी नेत्यांना धाकदपटशा, भाजप नेत्याचा आरोप
या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयवर्गीय हे भाजपचे प्रमुख रणनीतीकार होते. भाजपमधील अनेक नेते पक्षांतर करून तृणमूलचा रस्ता धरीत असल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना मंगळवारी प्रश्न केला होता. त्या वेळी त्यांनी हे उत्तर दिले. पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे आणि भाजपच्या नेत्यांना दरोडा, हत्या आणि भ्रष्टाचारासारख्या गंभीर, मात्र खोट्या गुन्ह्यांमध्ये जाणीवपूर्वक अडकवले जात आहे, असा आरोपही विजयवर्गीय यांनी केला.
विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही या वेळी प्रखर टीका केली. ‘देशाच्या इतिहासात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, अशा हुकूमशहांची नावे लिहायची झाली, तर त्यात बॅनर्जी यांचे नाव नक्की असेल. भारताच्या लोकशाहीची जगभरात प्रशंसा केली जाते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
तृणमूलचा काँग्रेसला टोला
‘१०० वर्षांच्या आजी आणि आजोबांनी २३ वर्षांच्या (तृणमूल काँग्रेस) तरुणाला काय करायचे ते सांगण्याचे दिवस केव्हाच सरले. बंगालबाहेरही भाजप, मोदी व शहांना पराभूत करता येते,’ असा टोला तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी मंगळवारी मारला. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘भाजपला पराभूत करता येते. मानसिकता बदलली आहे. विरोधकांमध्ये आम्हीही समान भागीदार आहोत. कारण, आम्ही २२-२३ वर्षांचे आहोत आणि कुणीतरी १०० वर्षांचे आहेत. आजी-आजोबांनी २२ वर्षांच्या ऊर्जावान पक्षाला काय करायचे ते सांगू नये. आम्ही मोदी-शहांशी टक्कर द्यायला तयार आहोत,’ असे ओब्रायन म्हणाले.