माचणूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती
हर… हर.. महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर गेला दुमदुमून….

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०२/ २०२५- तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्री निमित्त पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती.तहसिलदार मदन जाधव यांच्या हस्ते श्री च्या मुर्तीला अभिषेक घालून पुजा करण्यात आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिर परिसर हर.. हर.. महादेव च्या जय घोषाने दुमदुमून गेला होता.
माचणूर येथे भव्य असे हेमाडपंथी श्री सिध्देश्वराचे भीमा नदी काठावर मंदिर आहे.सोलापूरपासून 40 कि.मी.मंगळवेढ्या पासून 12 कि.मी अंतरावर असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस भव्य यात्रा भरते.सकाळी दर्शनासाठी मंदिराच्या गाभार्यापासून ते वेशी पर्यंत महिला व पुरुषांची रीघ लागल्याचे चित्र होते. वेशीपर्यंत पायर्यावर गतवर्षी प्रमाणे चटई टाकली नसल्यामुळे त्याचा त्रास भाविकांना सोसावा लागला.यात्रेत अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 2,पोलीस उपनिरीक्षक 3,पोलीस अंमलदार 45, होमगार्ड 25,आरसीपी 1 पथक असा बंदोबस्त नेमला होता. मंगळवेढा आगाराने येणे व जाणे अशा 40 फेर्या केल्या तर सांगोला आगाराने 1 बस,अक्कलकोट आगाराने 1 अशा बसेसनी फेर्या करुन भाविकांना ने आण केले. यावेळी वाहतूक नियंत्रक अशोक चव्हाण, वाहक शिवाजी लोखंडे आदींनी भाविकांची जाणे येण्याची चांगली सोय केली.

देवस्थान कमिटीने भाविकांच्या प्रसादाची सोय केली होती. मंगळवेढा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संभाजी यादव,प्रविण जाधव, मुजगोंडे आदींसह जिल्हा वाहतूक शाखेचे तानाजी मुदगूल व अन्य पोलीस कर्मचार्यांनी यात्रेमध्ये रोडवर कोठेही वाहतूकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतल्यामुळे दिवसभर वाहतूक सुरळीत होती. वाहनासाठी सिध्देश्वर प्रशाला येथे पार्कींगची व्यवस्था केली होती.
सायंकाळी माचणूर गावातून श्री च्या पालखीचे आगमन मंदिरात झाले.यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी माचणूर,ब्रम्हपुरी व अन्य गावातून महिला वर्ग पालखीच्या दरम्यान आरत्या दुतर्फा घेवून बसल्याने नयनरम्य चित्र दिसत होते.श्री च्या पुजेप्रसंगी आ.समाधान आवताडे,प्रांताधिकारी अमित माळी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या खा.प्रणितीताई शिंदे यांनी दुपारी श्री सिध्देश्वराचे दर्शन घेवून कार्यकर्त्यांना कामासाठी बळ मिळू दे अशी देवाकडे प्रार्थना केली.
मंगळवेढ्याच्या माजी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी पोलीस कर्मचार्यांसह श्री सिध्देश्वराचे दर्शन घेवून कायदा, सुव्यस्था अबाधीत राहू दे,पोलीस दलातील कर्मचार्यांना काम करण्याचे बळ दे अशी प्रार्थना केली.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दुपारी श्री च्या मुर्तीचे दर्शन घेवून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधीत राहो अशी मनोभावे श्री सिध्देश्वराला प्रार्थना केली.

