जिवाची हौस करण्यासाठी मुंबईला निघालेल्या त्या अल्पवयीन तिघी मैत्रिणीचा तीन तासात मुस्कान पथकाला शोध घेण्यात आले यश

त्या अल्पवयीन तिघी मैत्रिणींना मुस्कान- पोलीस पथकाने घेतले ताब्यात

जिवाची हौस करण्यासाठी मुंबईला निघालेल्या त्या अल्पवयीन तिघी मैत्रिणीचा तीन तासात मुस्कान पथकाला शोध घेण्यात आले यश…..

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा शहरात एका शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणार्‍या 12 वर्षे वयोगटातील अल्पवयीन तिघी मैत्रिणी घरात कुणालाही काहीही न सांगता जिवाची मुंबई करण्यासाठी मुंबई ला निघाल्या होत्या.पोलीसांच्या मुस्कान पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अखेर पंढरपूर बसस्थानकावरुन त्या तिघी मैत्रिणींना ताब्यात घेवून मंगळवेढा पोलीस स्टेशनला हजर केले.

याबाबतची माहिती अशी की ,मंगळवेढा शहरातील 12 वर्षे वयोगटातील तिघी मैत्रिणी बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत इयत्ता सातवी वर्गात शिकत होत्या.गुरुवार दि.०६ रोजी दिवसभर शाळा करुन शाळा सुटल्यानंतर त्या घरी गेल्या.घरात कोणालाही काहीही न सांगता तिघीजणी मिळून अचानक घरातून गायब झाल्याने तिन्ही कुटूंबातील पालकांना एकच धक्का बसला.वर्गात असतानाच या तिघींनी मुंबईला जावून जिवाची हौस करण्याचा प्लॅन रचला होता. त्याप्रमाणे त्या सायंकाळी 7 वाजता मंगळवेढा बसस्थानकावरून पंढरपूरला गेल्या.सायंकाळी 7 वाजता पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व पोलीस कर्मचारी आदल्यादिवशी गांजा पकडल्याने त्या कारवाईत व्यस्त असतानाच तिघी मुलींचे आई,वडील पोलीस ठाणे अंमलदारच्या खोलीत दाखल झाले व त्यांनी आमच्या तिन्ही मुली अचानक गायब झाल्या असून त्यांचा तात्काळ शोध घ्या असा आक्रोश करु लागले.

ठाणे अंमलदाराने ही घटना पोलीस निरीक्षक बोरीगिड्डे यांना कथन केली.त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी तात्काळ डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांना ही घटना सांगून शहर बीटच्या पोलीसांना बोलावून घेतले. स्टँड परिसर व प्रशालेचा परिसरातील सी.सी. टी.व्ही.चेक करण्याचे फर्मान काढले.यामध्ये तपासाला दिशा मिळाल्याने पो.नि.बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर,विजय पिसे,पोलीस हवालदार वंदना अहिरे,पोलीस हवालदार सुनिता चवरे,श्रीमंत पवार, पोलीस नाईक कृष्णा जाधव आदींचे मुस्कान पोलीस पथक पंढरपूरच्या दिशेने शोध घेत मार्गस्थ झाले. रात्री 9.30 वाजता हे पथक पंढरपूर बसस्थानकावर पोहचल्यानंतर त्या तिघी मुली मुंबईला जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्थानकावर बसल्याचे निदर्शनास येताच मुस्कान पथकाचा जीव भांड्यात पडला.

यावेळी पोलीसांनी त्या तिघींकडे अधिक चौकशी केली असता आम्ही मुंबईला फिरावयास निघालो आहोत असे सांगितले. आपल्याकडे फिरण्यासाठी किती पैसे आहेत? असे विचारले असता केवळ 60 रुपये असल्याचे त्या तिघी मैत्रिणींनी सांगताच मुस्कान पथकही कोड्यात पडले. एवढ्या पैशात तुम्ही मुंबईला जाणार का ? व जिवाची हौस करणार का ? असा प्रश्न करताच त्या विचारात पडल्या.तात्काळ या मुस्कान पथकाने त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला हजर केले आणि आई, वडिलांना बोलावून त्या तिघी मुलींचे पोलीस अधिकार्‍यांनी समुपदेशन करुन त्यांच्या ताब्यात दिले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading