बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पीडित महिलेच्या मदतीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे तत्पर
ॲड.संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून पीडितेशी थेट संपर्क,सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
अंबाजोगाई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ एप्रिल २०२५ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील, सोनगाव येथे वकिली करणाऱ्या महिलेवर गावच्या सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण केली. ध्वनि प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करण्याची आणि घरासमोरची गिरणी बंद करण्याची विनंती संबंधित महिलेनं केली होती. मात्र, याचाच राग धरून तिच्यावर हा हल्ला झाला. या संतापजनक घटनेची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी घेतली.
त्यांनी बीड जिल्हा शिवसेना महिला संपर्कप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य ॲड.संगीता चव्हाण यांच्याशी तातडीने संपर्क साधत पीडितेशी भेट घेण्याचे निर्देश दिले.
डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार ॲड.चव्हाण यांनी पीडितेची भेट घेऊन तिचे थेट डॉ. गोऱ्हे यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण घडवले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पीडितेची सविस्तर विचारपूस केली, तिच्या भावना जाणून घेतल्या आणि सर्वतोपरी मदतीचे ठोस आश्वासन दिले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आवश्यक ती सर्व मदत तिला मिळवून देण्यासाठी ॲड. संगीता चव्हाण यांना निर्देशही दिले.
या प्रकरणी डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी बीडचे अॅडिशनल एसपी श्री.तिडके यांच्याशी संपर्क साधून तपशीलवार चर्चा केली. या चर्चे दरम्यान आरोपींच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली असून सर्व आरोपी सध्या फरार असले तरी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पीडित महिलेचा जीव वाचला, असेही समोर आले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत.पोलिसांनी या दिशेने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
पीडित महिलेशी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,धाडसाने आणि निर्भयपणे तुम्ही जगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या लढ्यात तुम्हाला एकटं वाटू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण शासन तुमच्या सोबत आहे.

