येणाऱ्या रोपांमधून सरकोलीत ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या घराच्या दारात कन्या वृक्ष म्हणून पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने करणार लागवड

सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार

सरकोली ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०४/०६/२०२४ –५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सरकोली ता.पंढरपूर येथे बुधवार दि ०५/०६/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार आहे.

जागतिक स्तरावर वाढलेले उष्णतेचे प्रमाण, हवेतील कार्बन डायॉक्साईडची होणारी वाढ, वृक्षतोड,वृक्षसंवर्धन,नद्या नाल्यातील पाण्यात रसायन मिश्रीत द्रव्याची मिसळ, कारखाने, वाहने याव्दारे हवेत मिसळणारा कार्बन,हवेत वाढलेले धुळीचे प्रमाण, प्लास्टिक कचऱ्याचे साचणारे ढिग या आणि अशा अनेक समस्या पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी बाधक ठरलेल्या आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करून सरकोली पर्यटन स्थळ सनसेट पाॅईंटवर ५०० पिशव्या मध्ये आंबा कोया,जांभूळ,चिंच,फणस, पेरू, चिक्कू,कवठ,काजू अशा फळांच्या बियांचे श्रमदान मोहीमेव्दारे बिजारोपण करण्यात येणार आहे .

यात येणाऱ्या रोपांमधून सरकोली गावात ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या घराच्या दारात कन्या वृक्ष म्हणून पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने लागवड करण्यात येईल. बाकीची रोपे पर्यटन स्थळ येथे लागवड करण्यात येणार आहेत.

तरी पर्यावरण प्रेमी,पर्यटन स्थळ निर्मितीचे सेवेकरी,युवक,बाल सेवेकरी, जेष्ठ बंधू, भगिनी यांना यासाठी हातभार लावावा, यातून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन व्हावे व लेकीचे झाड तयार व्हावे याकरिता थोडासा वेळ द्यावा तसेच फळांच्या बिया,आंब्याच्या कोया किंवा रोपे ,फुलांची रोपे असतील तर ती पोहच करावीत असे आवाहन सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती समितीच्यावतीने करण्यात आले आहे अशी माहिती माजी पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *