राजकीय न्यूज

विविध विकास कामे त्वरित पुर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी

विविध विकास कामे त्वरित पुर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते कासेगाव येथील रोपवनात वृक्षारोपण

पंढरपूर , दि.31:- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येतो.निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या कासेगांव येथील वनविभागाची तसेच रांझणी येथील विविध विकासकामांची पाहणी उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.तसेच रांझणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपुर्ण असल्याने ते काम त्वरित पुर्ण करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांच्या त्यांच्यासमवेत आमदार समाधान आवताडे,मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,उपवन संरक्षक धैर्यशिल पाटील,अतिरिक्त मुख्याधिकारी संदीप कोहिनकर,उपमुख्याधिकारी सर्जेराव मिरकले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार ,सहा.जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले,जि.प.बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नरळे,गटविकास अधिकारी प्रशांत काळे,वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेला निधी व्यवस्थितपणे संबंधित विकास कामावर खर्च होतो किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते, त्याच अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व रांझणी येथील विविध विकास कामांची पाहणी केली असून, रांजणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपूर्ण आहे. तरी संबंधित ठेकेदारांनी पुढील एका महिन्याच्या आत दवाखान्याचे काम पूर्ण करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच विकास कामांसाठी मंजूर निधी मुदतीत खर्च करण्याबाबतच्या सूचना दिल्या.तसेच वन विभागाने औषधी वनस्पतींची लागवड करावी जेणेकरून त्यातून उत्पन्न मिळाल्याने इतर विकास कामासाठी त्या निधीचा वापर करता येईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कासेगाव ता.पंढरपूर येथे अटल आनंद घन वनप्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवन व रोपवाटिकेची पाहणी केली.रांझणी ता.पंढरपूर येथे जिल्हा नियोजनाच्या निधीतून रांझणी ते चळे या रस्त्याची, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य इमारत व प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, कर्मचारी निवासस्थान या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कासेगाव रोपवनामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. विकास कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. तसेच मार्गदर्शक सूचनाही त्यांनी दिल्या.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांसह स्थानिक नागरिक तुळशी वृंदावन पाहण्यासाठी येत असतात परंतु सद्यस्थितीत तुळशी वृंदावन बंद असल्याने ते लवकरात लवकर सुरू करावे तसेच कासेगांव विसावा येथे सभामंडप बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा,अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत रांझणी ते चळे या 1.500 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 10 लाख 77 हजार रुपये खर्च झाले असून रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.प्राथमिक शाळा इमारत बांधकामासाठी 21 लाख 62 हजार रुपये खर्च झाले असून इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे.पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य इमारत बांधकामासाठी 40 लाखांचा निधी मंजूर असून, आतापर्यंत 31 लाख 40 हजार रुपये खर्च करण्यात आले असून काम सुरू आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कर्मचारी निवासस्थान, संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी 4 कोटी 19 लाख 28 हजार रुपये इतका निधी मंजूर असून आतापर्यंत 02 कोटी 33 लाख 36 हजार रुपयाचा निधी खर्च झाला असून काम प्रगतीपथावर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी यावेळी सांगितले.

मौजे कासेगाव (ता.पंढरपूर) येथील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निकृष्ट वनाचे पुनर्वनीकरण,अटल आनंद घन वन प्रकल्पाअंतर्गत रोपवनात विविध रोपांची व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.यामुळे जैवविविधतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *