लसीकरणामुळे हात निकामी, जिल्हा प्रशासन खडबडून जागं, रुग्णाचे रक्तनमुने घेतले!


अमरावती : लसीकरणामुळे डावा हात निकामी झालेल्या नांदगाव पेठ येथील हरिदास याउल यांची शुक्रवारी वैद्यकीय चमूने तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. सदर प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वैद्यकीय विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. एकीकडे जिल्ह्यात लसीकरणाचा जोर सुरू असून दुसरीकडे मात्र हात निकामी झाल्याच्या घटनेमुळे लसीकरणाविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

हरिदास याउल यांनी पहिली लस घेतली तेव्हा हात बधिर झाला त्यानंतर त्यांचा हात पूर्णतः निकामी झाला. अमरावती आणि नागपूर येथील उपचारानंतर सुद्धा त्यांच्या हाताच्या हालचालीमध्ये काहीच फरक पडलेला नसून अखेर आज माध्यमांनी ही बाब प्रकाशित केल्यानंतर माहुली जहागीर येथील प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र शिरसाठ यांच्या चमूने हरिदास याउल यांच्या घरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच त्यांचे रक्तनमुने घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये पाठविले.

उच्चस्तरीय समितीकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून लवकरच या प्रकरणातील तथ्य बाहेर येईल, अशी आशा आहे. दरम्यान, डॉ .रवींद्र शिरसाठ यांनी सदर आजार हा डोक्यातील नस आणि मणक्याशी संबंधित असल्याचे सांगितले. प्रथमदर्शनी याचा लसीकरणाशी संबंध नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले मात्र जोपर्यंत उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत याबाबत निश्चित निदान करणे योग्य नसल्याचे मत डॉ. रवींद्र शिरसाठ यांनी व्यक्त केले.

नांदगाव पेठ प्रा आ. उपकेंद्रचे डॉ. जुबेर अली म्हणाले की, सदर वृत्त प्रकाशित झाल्याने लसीकरण करणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु वैद्यकीय सूत्रांनी केलेल्या सूचक आवाहनानंतर लसीकरणाला पुन्हा चांगला प्रतिसाद लाभला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: