शरद पवारांचा पुणे मेट्रोतून प्रवास; चंद्रकांत पाटील मेट्रो कंपनीवर भडकले! म्हणाले…


हायलाइट्स:

  • शरद पवारांनी केला पुणे मेट्रोतून प्रवास; कामाचा घेतला आढावा
  • भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा मेट्रो कंपनीवर आक्षेप
  • पुण्यातील इतर लोकप्रतिनिधींना का डावलले? – चंद्रकांत पाटील

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुणे मेट्रोतून (Pune Metro) प्रवास केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सध्या सुरू असलेल्या कामाचीही माहिती घेतली. पवारांच्या या पाहणीला भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतला आहे. आमदारांनी मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणला पाहिजे, असा संताप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार अधूनमधून पुण्यातील विकासकामांची पाहणी करत असतात. यापूर्वी दोन वेळा भल्या सकाळी त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. आज चक्क शरद पवार यांनीच मेट्रोतून प्रवास केला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अचानक मेट्रो स्थानकाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. कामांमध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. फुगेवाडी स्थानक ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत त्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे पवारांनी उभे राहूनच प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व काही अधिकारी देखील त्यांच्या सोबत होते. फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली.

वाचा: ‘यूपीतील ‘हा’ अंडरकरंट भाजपच्या हेकेखोरीला चिरडून टाकेल’

भाजपनं पवारांच्या या मेट्रो पाहणीला आक्षेप घेतला आहे. पुण्यातील कुठल्याही खासदाराला किंवा आमदाराला न कळवता मेट्रो कंपनीनं आज शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल घेतली. ‘शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत. परंतु अशा प्रकारे घाईघाईत ट्रायल घेण्याचं कारण काय? ही श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? सुमारे ११ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यातील ८ हजार कोटी रुपयांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान केंद्र सरकारचं आहे. तीन हजार कोटी महापालिकेचे व काही प्रमाणात राज्याचं योगदान आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मेट्रोचं उद्घाटन होणार होतं. पण कोविड स्थितीमुळं ते लांबवणीवर पडलं. मग मेट्रो कंपनीला इतकी घाई का झाली?,’ असा सवाल पाटील यांनी केला.

वाचा: शरद पवारांबद्दल बोलताना फडणवीस हे विसरले की…; सुप्रिया सुळे यांचा टोला

‘पुण्यात विविध पक्षांचे आमदार आहेत. त्यांना का डावललं गेलं? हे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचं हे काम आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना मेट्रोचा प्रकल्प का पूर्ण नाही झाला? फडणवीसांचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं हा प्रकल्प पूर्ण झाला. पण आता वेगळंच सुरू आहे. मेट्रो कंपनीनं ही घाई कशाला केली? मी कंपनीविरोधात हक्कभंग मांडणारच आहे. पण अन्य आमदारांनीही हक्कभंग मांडावा, ही आपल्या हक्कावरची गदा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

वाचा: सर्वसामान्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन

‘हे उद्घाटन नाही, ट्रायल आहे असं मेट्रो कंपनीचं म्हणणं आहे. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायल असेल तर तिथं शरद पवार कशाला हवेत? त्यांनी मेट्रोनं प्रवास करायचा, त्याचे फोटो छापून आणायचे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे झालं असं सांगायचं, हा काय प्रकार आहे, असं पाटील म्हणाले.

शरद पवारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: