पास विसरल्याने विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवले : आमदार समाधान आवताडे आक्रमक,एस.टी.वर कारवाईची मागणी
विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ :मंगळवेढ्यात एस.टी.चा निष्काळजीपणा,आमदार समाधान आवताडेंनी mla samadhan avtade दिले आदेश
Mangalwedha news : मंगळवेढा / सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या प्रथमेश राहुल पाटील या विद्यार्थ्याबाबतीत एस.टी.महामंडळाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

सोलापूर मंगळवेढा (बस क्रमांक 9405) या एस.टी. बस मधून प्रवास करत असताना पास विसरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला थेट महामार्गावर उतरवण्यात आले ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला.
प्रथमेश पाटील हा दररोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो.शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी सुमारे पाच वाजता तो एस.टी.ने प्रवास करत होता. यावेळी त्याचा पास बॅगेत न सापडल्याने तो गोंधळून गेला. त्याने घाबरलेल्या अवस्थेत वडिलांना फोन करून पैसे देण्याची विनंती केली.मात्र वाहकाने कोणतीही सहानुभूती न दाखवता गर्दीच्या वेळी विद्यार्थ्याला बसमधून उतरवले.अचानक महामार्गावर सोडल्यामुळे प्रथमेश घाबरून गेला.डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणाऱ्या वाहनांमुळे त्याची अवस्था बिकट झाली.काही वेळानंतर एका दुचाकीस्वाराच्या मदतीने तो कसाबसा घरी पोहोचला.घरी आल्यानंतर थरथरत्या आवाजात घडलेला प्रकार सांगताच कुटुंबीय हादरून गेले.

या गंभीर घटनेची दखल घेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान महादेव आवताडे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा च्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत पत्र पाठवले आहे.सदर पत्रात त्यांनी संबंधित एस.टी. बसच्या चालक व वाहकाची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व चालक व वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, विशेषतः विद्यार्थ्यांबाबत मानवी दृष्टिकोन ठेवावा, असे निर्देश आमदार आवताडे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे एस.टी.महामंडळातील प्रवासी सुरक्षा,वाहकांची संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पास विसरल्याने एस.टी.बसमधून विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढ्यात उघडकीस आला असून आमदार समाधान आवताडेंनी संबंधित वाहकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
