‘विराट कोहलीला आणखी काही दिवस कर्णधार म्हणून पाहायचे होते’; भारतीय खेळाडूची ‘मन की बात’


मुंबई : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून विराट कोहलीने शनिवारी (१५ जानेवारी) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, विश्वचषक विजेते भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे. विराटला आणखी काही दिवस कर्णधारपदी पाहायचे होते, असे मदन लाल म्हणाले.

एएनआयशी बोलताना मदन लाल म्हणाले की, असे निर्णय वैयक्तिक असतात, पण त्याचे यश नेहमीच त्याच्यासोबत राहील. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, तसेच जगातील चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो ज्या पद्धतीने संघाचे नेतृ्त्व करायचा, संघाचे कर्णधारपद सांभाळत होता, त्यामुळे तो कर्णधारपद सोडेल, असे वाटत नव्हते. या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले. तो भावनिक आणि नेहमी जिंकण्यासाठी खेळणारा कर्णधार होता. जेव्हा आपण त्याला टीव्हीवर पाहतो, तेव्हा आपण अशा कर्णधारपदाचा आनंद घेतो आणि अचानक असा कर्णधारपद सोडल्याचा बॉम्ब पडल्याने दु:ख होते.

मदन लाल पुढे म्हणाले की, कोहलीने हा संघ बनवला आहे, आणि त्यामुळेच मला त्याला आणखी काही दिवस कर्णधारपदी पाहायचे होते. आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन झालो. त्याने वेगवान गोलंदाजांची मजबूत फळी तयार केली. आज भारतीय वेगवान गोलंदाज जगभरात ओळखले जातात आणि त्यामागे कोहलीचे योगदान आहेच. जेव्हा तुम्ही कसोटी सामने जिंकता, तेव्हा त्याचा परिणाम एकदिवसीय आणि टी-२० वरही होतो. या व्यक्तीने सर्व काही केले आहे. कर्णधार या नात्याने त्याने संघाच्या कमकुवत जागांवर काम करत संघाला मजबूत केले. याचे संपूर्ण श्रेय कोहलीला जाते.

पुढील महिन्यात श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा बेंगळुरू येथे कसोटी सामना होईल. हा विराटचा १००वा कसोटी सामना असेल. विराटला १००व्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्वकरून कर्णधारपद सोडता आले असते. पण त्याने असे केले नाही. बीसीसीआयने याबाबत त्याला ऑफरही दिली होती, पण कोहलीने ही ऑफर नाकारली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: