आषाढीवारीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर
अत्यावश्यक सुविधांची कामे 30 जून पर्यत पुर्ण करावीत
पंढरपूर, दि. 21: – आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यांतून लाखो वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच अत्यावश्यक सुविधांची कामे 30 जून पर्यत पुर्ण करावीत अशा सुचना नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुध्द जेवळीकर यांनी दिल्या.

आषाढी यात्रा पुर्वतयारी नियोजन व सुविधांबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी तथा समन्वय अधिकारी वी.ना. धाईंजे, प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी जेवळीकर म्हणाले, आषाढी वारी सोहळा यशस्वी होण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. नगरपालिकेने भक्ती सागर (65 एकर) येथील मुरमीकरण करणे काटेरी झाडे झुडपे काढणे, टॉयलेट स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आदी करावित यावी तसेच 65 एकर येथील वाहन तळावर चिखल होऊ नये यासाठी तात्काळ मुरमीकरण करावे. शहरातील अतिक्रमणे धोकादायक इमारतीबाबत तात्काळ कार्यवाही करावी मोकाट जनावरे भटके कुत्रे यांचा बंदोबस्त करावा.शहरातील असणाऱ्या सुलभ शौचालय येथे वारकरी भाविकांना विनामूल्य सुविधा द्यावी. सुलभ शौचालय भाविकांसाठी मोफत राहील याची दक्षता घ्यावी. 65 एकर पासून शेगाव दुमाला कडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांची स्वच्छता व दुरुस्ती करून घ्यावी.
वारकरी भाविकांसाठी पॅक बंद पाण्याच्या बाटलीचे वितरण करण्यासाठीचे ठिकाणे निश्चित करावीत. पाणी वितरण व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर प्लॅस्टिक कचरा कुठेही साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील रस्ता दुभाजकावरील अनावश्यक झाडे झुडपे काढावीत तसेच ते स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. जलसंपदा व नगरपालिका प्रशासनाने घाटावरील बॅरिकेटिंग करण्याबाबत समन्वय साधून नियोजन करावे. आवश्यक ठिकाणी घाटांची दुरुस्ती करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आषाढी वारी कालावधी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली. तर मंदिर समितीकडून दर्शन रांग, पत्रा, दर्शन मंडप येथे भाविकाना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्हावे यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या बैठकीत नगरपालिका,महावितरण, एस.टी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस प्रशासन, जलसंपदा, आदी विभागांचाही आढावा घेण्यात आला.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.