जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले पालखीचे स्वागत

पंढरपूर,दि.12 (उमाका):- चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत भक्ती रसात चिंब न्हावून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.पालखीचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रकाश महानवर,सोलापूर प्र. उपविभागीय अधिकारी अमित माळी,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे,जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.

हाती दिंड्या पताका,मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा- ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे.

नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले.यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी केले सारथ्य
पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासू पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली.

नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत
अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
नेत्रदीपक रिंगण सोहळा
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले.पताका, हांडे- तुळशी, विणेकरी,मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले.त्यानंतर अश्व रिंगणी धावले.अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली.डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.