कोल्हापूर दंगलीबाबत पोलिसांनीही या दंगलीतील आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील शस्त्र जप्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 5 एफआयआर नोंदवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सर्व शिवप्रेमींना 14 जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी एकत्र येण्यास सांगितले होते. संभाजीराजे यांच्या या आवाहनानंतर 14 जुलै रोजी विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते विशाळगडावर मोठ्या प्रमाणात जमले.
हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना विशाळगडावर जायचे होते मात्र पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही यानंतर तिथे तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त जमावाने विशाळगडाच्या पायथ्याशी गोंधळ केला. पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी कसेबसे जमावाला तेथून दूर केले.
विशाळगड सोडल्यानंतर आंदोलक तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर गावात असलेल्या मुस्लिमबहुल भागात पोहोचले. तिथे पोलिसांनी आधीच काही गोंधळ होऊ नये या साठी पोलीस तैनात केले होते.
आंदोलकांच्या गर्दीत काही समाजकंटकांनी मुस्लिम भागात घराची तोडफोड केली. दुचाकी-चारचाकी फोडण्यात आले. धार्मिक स्थळांचे नुकसान करण्यात आले. दंगलखोरांनी काही पोलिसांवर हल्ला केला. त्यात 7 पोलीस जखमी झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत या दंगलीतील 24 दंगलखोरांना अटक केली आहे. तसेच या दंगलीतील हल्लेखोरांची माहिती गोळा करायला सुरु केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या विशाळगड आणि गजापुरात परिस्थिती सामान्य आहे. कोल्हापूर पोलिसांचे 1 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. विशाळगड परिसरात 21 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलग्रस्त गावात मोडकळीस आलेल्या घरांची जीर्णोद्धार सुरू झाली असून, नुकसान झालेल्या धार्मिक स्थळी प्रार्थनाही सुरू झाल्या आहेत. पोलीस तपासात आतापर्यंत 30 हून अधिक हातोडे आणि सुमारे 100 काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.