वाखरी मार्गावरील रस्त्याची दुर्दशा केव्हा रस्ता चांगला होणार वारी तर तोंडावर
येथील रस्तेही उखडून ठेवलेले व या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने
पंढरपूर /नंदकुमार देशपांडे/ज्ञानप्रवाह न्यूज – आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेल्या व सर्व संतांच्या पालख्यांचे आगमनाचे ठिकाण असलेल्या वाखरी येथील पंढरपूरात प्रवेश करणाऱ्या वाखरी पुलावर सध्या प्रवाशांना व वाहनधारकांना ये जा करणे कठीण झाले आहे याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून वाखरी ते पंढरपूर या मार्गावर असलेल्या रस्त्याच्या कामामुळे .येथील रस्तेही उखडून ठेवल्यामुळे व या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने होत असल्याने वाहनाची कोंडी होत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या पालखी मार्गाच्या कामाकडे कोणाचेच लक्ष नाही असे दिसत आहे.हा मार्ग संतांच्या पालखीचा मार्ग समजला जातो असे असले तरीही या मार्गावरील रस्त्याची दुर्दशा काही केल्या कमी होत नाही.या रस्त्याचे कामे चालू असून या कामाकडे लोकप्रतिनिधी लोकसेवक शासकीय अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नसल्याने संबंधित ठेकेदार हा या रस्त्याचे काम कासवगतीने करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
वास्तविक पाहता या मार्गावरील रस्त्याची कामे दर्जेदार व चांगल्या पद्धतीने तसेच वेळेवर पूर्ण होणे गरजेचे असताना या रस्त्याच्या कामाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारक, ये जा करणारे पादचारी तसेच दुचाकी स्वार यांना या मार्गावरून जाणे कठीण बनले आहे.या रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसांमुळे जागोजागी खड्डे पडल्यामुळेही वाहनधारकांसाठी ये जा करणे अत्यंत धोकादायक झाले आहे.

वास्तविक या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असताना व जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन सुद्धा संबंधित ठेकेदाराने या आदेशाकडे पाठ फिरविल्याचे वरील रस्त्याच्या चित्रावरून दिसत आहे.आषाढी यात्रेचा सोहळा हा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असून या मार्गावरील रस्त्याची कामे धिम्या गतीने चालू असल्याने वारी पर्यंत तरी हा रस्ता पूर्ण होईल का नाही अशी शंका सर्वांच्या मनात असून जरी रस्ता झाला तरी तो दर्जेदार व टिकाऊ होईल याची शाश्वती कोणालाच देता येत नाही अशी चर्चा आहे.
पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे यांनीही विधानसभेत तसेच वेळोवेळी झालेल्या वारी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या होत्या तरीही याकडे दुर्लक्ष केल्याचेच जाणवत आहे.

