बोपदेव घाटात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित या सुविधांची वेळोवेळी देखरेख व दुरुस्तीचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

बोपदेव घाटात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या निर्देशांची अंमलबजावणी

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ जून २०२५ : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार बोपदेव घाट परिसरात पुणे पोलीस प्रशासनाने सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.त्याची प्रभावी अंमलबजावणी करत पोलीस प्रशासनाने या परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोपदेव घाटासह शहरातील निर्जन ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे,पोलीस चौक्या अद्ययावत करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची नियमित देखरेख करणे तसेच रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि भोंग्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.या सर्व सूचनांची अंमल बजावणी पुणे पोलिसांनी तत्परतेने केली आहे.

याबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस प्रशासन आणि संबंधितांचे आभार मानले असून या सुविधांची वेळोवेळी देखरेख आणि दुरुस्ती करण्याचे आवाहनही त्यांनी केले. लवकरच त्या स्वत: या सुविधांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

बोपदेव घाट परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Back To Top