शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक,हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना
हिंगोली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जून २०२५ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट खत विक्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस खत विक्री हे केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकऱ्यांच्या श्रमांवर आणि उत्पादनावर थेट घाला आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी २० जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आपली मागणी मांडली.विभागाने या तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सूचित केले आहे की, अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य स्तरावर विशेष चौकशी समिती तातडीने स्थापन करावी.खतांच्या गुणवत्तेची तपासणी करावी.खत विक्रीसाठी ई-पॉस प्रणाली सक्तीची करून त्यासंदर्भात व्यापाऱ्यांना प्रशिक्षण व जनजागृती करण्यात यावी. बनावट खतामुळे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यां साठी विशेष नुकसानभरपाई योजना लागू करावी.
संशयित खत उत्पादक कंपन्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावेत व गरज असल्यास त्यांच्यावर फसवणूक आणि सार्वजनिक जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी सुचवले.
कृषी खात्याने शेतकऱ्यांचा विश्वास जपण्या साठी पारदर्शकता आणि तत्परता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे,अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.