कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

तत्काळ चौकशी करत कारवाई करण्याची मागणी

संभाजीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज,२९ जून २०२५ : संभाजीनगर येथील चिंचडगावात कीर्तनकार संगीता पवार यांची दि.२८ जून रोजी पहाटे निर्घृण हत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना केली आहे.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रामध्ये या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या संगीता पवार यांच्यावर झाला प्रकार केवळ क्रूरच नाही तर महिलांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या पत्रात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाची तत्काळ सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. संबंधित आरोपीला त्वरीत अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पीडितेच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत, संरक्षण आणि आवश्यक न्यायसाहाय्य दिले जावे.

यासोबतच राज्यभरातील महिला कलाकार, कीर्तनकार व समाजप्रबोधन करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, असेही त्यांनी सूचित केले आहे.

समाजाला दिशा देणाऱ्या महिलांवर असे अत्याचार होणे हे अत्यंत दुर्दैवी असून, प्रशासनाने त्वरीत पावले उचलली पाहिजेत, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.या प्रकरणात सरकारने तत्काळ आणि ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत शासनावरील विश्वास दृढ राहावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Back To Top