श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न
सवाद्य मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.07 :- अनंत चतुर्दशी दि.06 सप्टेंबर रोजी श्री गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील श्री विठ्ठल सभा मंडप येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणपती मूर्तीची विधिवत पूजा सकाळी 9.00 वाजता मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली.

त्यानंतर सकाळी 11.00 वाजता श्री संत नामदेव पायरीपासून श्री गणपतीची विसर्जन मिरवणूक नगर प्रदक्षिणा मार्गाने सवाद्य मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली.भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. अबदागिरी निशाने ढोल,वारकरी दिंडी,वैजापूर बँड, लेझीम, संबळ,मर्दानी खेळ,स्थानिक बँड अशा लवाजम्यासह मोठ्या थाटामाटात निघाली.त्यावेळी मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी,प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, विभाग प्रमुख संजय कोकीळ,राजेश पिटले,सुधीर घोडके यांच्यासह मंदिर समिती कर्मचारी वृंद यांनी विसर्जन सोहळा मिरवणूक शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे श्री गणपती मूर्ती (शाडूची ) पर्यावरण पूरक असूनही नदीपात्रात विसर्जन न करता नगरपालिकेच्या संकलन केंद्रामध्ये जमा करण्यात आली.
