मुळ आटपाडीच्या मुळावर उठु नका – सादिक खाटीक

मुळ आटपाडीच्या मुळावर उठु नकासादिक खाटीक

एस टी स्टॅन्ड,दवाखाना,खादी भांडार,ओढा पात्र,मुख्य पेठेचे महत्व संपवू नका – मुळ आटपाडीच्या मुळावर उठलेल्यांना सादिक खाटीक यांचे आवाहन

आटपाडी / ज्ञानप्रवाह न्यूज – आटपाडीचे एस टी स्टॅन्ड, प्राथमिक आरोग्य केंद्र,खादी भांडार,लगतचे ओढा पात्र, आटपाडीची मुख्य पेठ यांचे महत्व संपवण्याचा घाट काहींनी घातल्याचे बोलले जात असून मुळ आटपाडीच्या मुळावर उठलेल्यांनों मुळ आटपाडीचे महत्व,महात्म्य संपवू नका असे कळकळीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी मुळ आटपाडी शहराच्या मुळावर उठलेल्यांना केले आहे.
               
प्रिंट मिडीया,इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या माध्यमातून आटपाडी शहराविषयी नागरीकांना सतर्क सजग करण्याच्या उद्देशाने सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले असल्याचे प्रारंभीच त्यांनी स्पष्ट केले आहे.
               
जिल्हा उपरुग्णालय आटपाडी नगरपंचायत हद्दीत साकारल्याने जिल्हा परिषद अधिपत्याखालील आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोकळ्या होणाऱ्या एस टी स्टॅन्ड जवळच्या विस्तीर्ण जागेत आटपाडी नगरपंचायतीचे मुख्यालय व्हावे. नगर पंचायतीचे सर्व विभाग,सर्व सोपस्कर याच परिसरातून सुरू व्हावेत अशी मुळ आटपाडीतल्या नागरीकांची मागणी आहे . आहे त्याच जागी प्रशस्त एस टी स्टॅन्ड साकारले जावे,लगतच्या खादी भांडारचे  रूपडे नेत्रदीपक आणि जगविख्यात व्हावे, पेठेतील राजवाडा परिसर मुळ आटपाडीचा, वैभवशाली मुख्य आत्मा व्हावा, विकास परिवर्तनाच्या प्रचंड व्यवस्थेचे प्रतिक बनावे. पेठेतल्या रस्त्याला रुंदीकरणाचा नवा आयाम देत मुळ शहराची मुख्य पेठ आणि लगतचे सर्व ओढापात्र मुळ आटपाडीचे वैभव ठरावे यासाठी सातत्याने आवाज उठविला जात आहे.
               
आटपाडी शहराच्या दीडशे वर्षापासूनच्या ७ फुट रुंदीच्या दगडी संरक्षक भिंत ओलांडून ओढापात्रात,ओढ्या लगतच्या रस्त्यावर अनेक वर्षापासून अतिक्रमणांचा प्रचंड धडाका सुरू असताना त्याला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणारे काही कर्तेकरविते मुळ आटपाडीची समस्या बनु लागले आहेत.
               
आटपाडी नगरपंचायतीचे पुर्ण व्यवस्थापन महावितरण केंद्रालगतच्या शासकीय धान्य गोदामाच्या जागेत न्यायचे, वसवायचे.आटपाडीचे सध्याच्या ठिकाणचे एस टी स्टॅन्ड,एस टी डेपो लगत प्रशस्त स्वरूपात न्यायचे.येथून निघालेल्या दोन चार रूटच्या गाड्या मुळ ठिकाणी थांबतील एवढे मर्यादीत स्वरूप सध्याच्या एस टी स्टॅन्डला आणायचे.खादी भांडारचे ऐतिहासीक महत्व संपवून त्या ठिकाणाला बकाल स्वरूप येण्यासाठी प्रयत्न करायचे आणि लगतचा ओढा अतिक्रमणांच्या माध्यमातून कसा संपेल यासाठी सोयीस्कर डोळेझाक करणारी भूमिका बजावण्याचे काम,मुळ आटपाडीचे महत्व संपविण्याचा विडा उचलून महत्व महात्म्य संपवायला निघालेल्यांना समस्त आटपाडीकरांनी वेळीच रोखणे महत्वाचे आहे.याकडे सादिक खाटीक यांनी मुळ आटपाडीकर आणि मुळ आटपाडीप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
               
आटपाडी-दिघंची रोडवरील शेरेवाडी पाटीपर्यतचा परिसर, आटपाडी-निंबवडे रोड वरील मापटेमळा संपेपर्यतचा परिसर, आणि आटपाडी – कौठुळी रस्त्यावरील पुजारवाडी पर्यतच्या परिसरात प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या प्लॉटींगच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस येण्यासाठीच हे कर्तेकरविते मुळ आटपाडीचे अप्रत्यक्षरित्या महत्व व महात्म्य संपविण्याचा प्रयत्न करू लागल्याच्या जनता जनार्धनांचा कयास आहे .
               
आटपाडी शहर आणि तालुका सर्वच बाजूंनी कमजोर व्हावा म्हणून अनेक वर्षापासून अप्रत्यक्षरित्या हळूहळू काम करणाऱ्या बाहेरच्या नेत्यांनी नेहमीचं आटपाडीचे अहित चिंतले आहे.मुळ आटपाडीचे महत्व,महात्म्याच्या मुळावर उठलेल्या सर्वांना आटपाडीकरांनी वेळीच रोखण्यासाठी संघटीतपणे जोरदार आवाज उठविणे महत्वाचे आहे.प्रसंगी लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी मुळ आटपाडीकर आणि मुळ आटपाडी शहर प्रेमींनी प्रचंड संख्येने एकवटावे असे आवाहनही सादिक खाटीक यांनी शेवटी केले आहे .

सादिक खाटीक

Leave a Reply

Back To Top