कर्मवीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रयतची वाटचाल : चेअरमन चंद्रकांत दळवी
पंढरपूरात कर्मवीरांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्था आजही वंचित व दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीरांनी लावलेले छोटेसे रोपटे आज एक विशाल वटवृक्ष झाले आहे.संस्थेने काळाबरोबर बदल स्वीकारले असून संगणकीय शिक्षण, इंट्रॅक्टिव्ह पॅनल,आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या उपक्रमांमुळे संस्था प्रगतिपथा वर आहे.भविष्यात रयत शिक्षण संस्था पेपरलेस प्रशासनाच्या दिशेने वाटचाल करेल,असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील होते.
यावेळी मंचावर आजीव सेवक डॉ सदाशिव कदम, प्रा. नानासाहेब लिगाडे,सुनेत्राताई पवार,ॲड.गणेश पाटील, अमरजीत पाटील, बाळासाहेब पाटील,राजेंद्र केदार,नवनाथ जगदाळे,डॉ.जे.जी.जाधव,वसंत देशमुख, संजय क्षीरसागर, चंद्रकांत गायकवाड, प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, आर.पी. भोसले, प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे,प्राचार्य डॉ.डी.जे. साळुंखे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेने गेल्या शंभर वर्षांत लाखो विद्यार्थी घडवले आहेत .आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून संस्थेला सक्षम करण्यासाठी त्यांचा सहयोग अत्यावश्यक आहे.रयत पॅटर्न हा शिक्षण क्षेत्रात नव्या दिशेने मार्गक्रमण करणारा उपक्रम आहे.त्यामुळे संस्था जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक ठरेल,असा विश्वास आम्ही बाळगतो.

यानंतर यशवंत विद्यालयातील तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा,वक्तृत्व, निबंध लेखन व रांगोळी स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यापीठीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर संस्थेतील गुणवंत प्राध्यापकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.अमर कांबळे यांनी करून दिला.या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेचे तसेच कर्मवीर गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मान्यवर तसेच सिनिअर,ज्युनिअर व व्होकेशनल विभागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, रयतसेवक, सेवानिवृत्त सेवक, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमर कांबळे व प्रा.रोहिणी बावचकर यांनी केले.मुख्याध्यापक अनिता साळवे यांनी आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
